गडचिरोलीविदर्भ

धानोरा येथे महसूल, पोलीस आणि मुक्तिपथची संयुक्त समन्वय बैठक

४३ पोलीस पाटलांची कार्यशाळा

धानोरा : तालुक्यातील अवैध दारू विक्रीला पूर्णपणे पायबंद घालण्यासाठी आणि गावे व्यसनमुक्त करण्यासाठी प्रशासनाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. याच उद्देशाने तहसील सभागृहात महसूल विभाग, पोलीस विभाग आणि ‘मुक्तिपथ’ अभियानाच्या वतीने तालुक्यातील पोलीस पाटलांसाठी एक विशेष समन्वय बैठक व कार्यशाळा उत्साहात पार पडली. या बैठकीतून अवैध दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस पाटलांना थेट मैदानात उतरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

धानोरा तालुका मुक्तिपथ समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार गणेश माळी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आरमोरी मुक्तिपथ तालुका संघटक विनोद एल. कोहपरे उपस्थित होते. मंचावर धानोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धुळे, चातगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी एम.डी. टेंभुर्णे आणि महसूल विभागाचे प्रकाश अटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यशाळेत तालुक्यातील ४३ पोलीस पाटलांना गावातील शांतता राखण्यासाठी आणि अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी माहिती तंत्र: गावातील अवैध दारू विक्रेत्यांची माहिती कोणतीही भीती न बाळगता तात्काळ पोलीस आणि मुक्तिपथ चमूला देणे. संघटन बांधणी: गावागावांत ‘मुक्तिपथ गाव संघटना’ आणि महिलांच्या ‘शक्तीपथ’ संघटनांची स्थापना करण्यासाठी पुढाकार घेणे. उपचार शिबिरे: दारूची मागणी कमी करण्यासाठी पिणाऱ्या व्यक्तींचे मनपरिवर्तन करून त्यांच्यासाठी व्यसन उपचार शिबिरे आयोजित करणे. निवडणूक संकल्प: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पूर्णतः ‘दारूमुक्त’ वातावरणात पार पाडून लोकशाहीचे पावित्र्य राखणे. इत्यादी जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या.

अध्यक्षीय भाषणात तहसीलदार गणेश माळी यांनी पोलीस पाटलांना स्पष्ट बजावले की, “पोलीस पाटील हा गावाची शांतता व सुव्यवस्था राखणारा महत्त्वाचा दुवा आहे. गावातील अवैध दारू विक्रीमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. हे रोखण्यासाठी पोलीस पाटील, प्रशासन आणि मुक्तिपथ चमूने समन्वयाने काम करून कठोर उपाययोजना राबवणे काळाची गरज आहे.”

केवळ चर्चाच नाही, तर सामाजिक प्रबोधनाचाही संदेश या बैठकीत देण्यात आला. स्पार्क विद्यार्थी शुभम कलोडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि आपल्या बहारदार गायनातून उपस्थितांना व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून दिले. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी धानोरा व आरमोरी येथील महसूल विभाग आणि मुक्तिपथ चमूने विशेष परिश्रम घेतले. प्रशासनाच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button