चेकपोस्टवर ट्रक पास करण्यासाठी ५०० रुपयांची लाच ; खाजगी एजंटसह मोटार वाहन निरीक्षकाला रंगेहात अटक

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (ACB) केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई
नागपूर : महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील खुर्सापार आरटीओ चेकपोस्ट येथे ट्रक पास (एन्ट्री) करून देण्यासाठी ५०० रुपयांची लाच घेताना प्रादेशिक परिवहन विभाग, नागपूर ग्रामीणचे मोटर वाहन निरीक्षक आणि त्यांच्या संगनमताने काम करणाऱ्या एका खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली आहे.
या कारवाईत मोटर वाहन निरीक्षक साजन शालिग्रामजी शेंडे (वय ५० वर्ष) आणि खाजगी इसम प्रवीण बाबुराव गायधने (वय ५० वर्ष) या दोघांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले असून, यामुळे आरटीओ वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील तक्रारदार हे स्वतः ट्रक चालक व मालक आहेत. यापूर्वीही त्यांच्याकडून खुर्सापार आरटीओ चेकपोस्टवरील अधिकारी व तेथील खाजगी पंटर यांनी वाहन पास (एन्ट्री) करण्यासाठी ५०० रुपयांची लाच घेतली होती. तक्रारदार यांना पुन्हा एकदा याच सीमा तपासणी नाक्यावरून आपला ट्रक पास करायचा होता. मात्र, तिथे गेल्यावर पुन्हा लाचेची मागणी होणार याची खात्री असल्याने, त्यांनी लाचखोरांना धडा शिकवण्याचे ठरवले. त्यांनी १० जून रोजी नागपूर येथील एसीबी कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहून कायदेशीर तक्रार नोंदवली.
तक्रारदाराच्या अर्जावरून एसीबीच्या पथकाने ११ जून रोजी लाच मागणीची पडताळणी केली. त्यावेळी खुर्सापार आरटीओ चेकपोस्टवर मोटर वाहन निरीक्षक साजन शेंडे हे कर्तव्यावर हजर होते. त्यांच्या समोरच खाजगी इसम प्रवीण गायधने याने ट्रक एन्ट्रीसाठी ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच मागणी निश्चित होताच एसीबीच्या पथकाने चेकपोस्टवरच सापळा रचला. खाजगी इसम प्रवीण गायधने याने तक्रारदाराकडून ५०० रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली, तर अधिकारी साजन शेंडे यांनी या कृत्याला प्रोत्साहन दिल्याने एसीबीच्या पथकाने झडप घालून दोघांनाही रंगेहाथ ताब्यात घेतले. या प्रकरणी नागपूर ग्रामीणमधील केळवद पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ (अ) आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूरचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर आणि अपर पोलीस अधीक्षक विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपअधीक्षक भारती गुरनुले यांच्या पर्यवेक्षणाखाली करण्यात आली. या यशस्वी मोहिमेचे नेतृत्व सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक मयुर चौरसिया यांनी केले. तर सापळा पथकात पोलीस निरीक्षक राजकिरण येवले, पोलीस हवालदार योगेश साधनकर, महिला पोलीस हवालदार कांचन गुलबासे, पोलीस अंमलदार उपेंद्र आकोतकर, सचिन किन्हेकर आणि चालक पोलीस हवालदार विलास इंगळे यांनी मोलाची कामगिरी बजावली.



