विदर्भातील शाळा आता ३० जूनपासूनच सुरू होणार! ; २२ जूनचा वादग्रस्त निर्णय अखेर रद्द

नागपूर खंडपीठाच्या तीव्र नाराजीनंतर शिक्षण विभागाची माघार ; वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी अन् पालकांना मोठा दिलासा
नागपूर : विदर्भातील शाळा २२ जूनपासून सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा वादग्रस्त निर्णय अखेर मागे घेण्यात आला असून, आता या भागातील सर्व शाळा ३० जूनपासूनच सुरू होतील. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या कडक निर्देशानंतर शिक्षण विभागाने यासंदर्भातील आपले आधीचे परिपत्रक रद्द केले आहे. विदर्भातील कडक उन्हाळा आणि उष्णतेची लाट लक्षात घेता न्यायालयाच्या या हस्तक्षेपामुळे लाखो विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यापूर्वी शिक्षण विभागाने विदर्भातील शाळा १५ जूनऐवजी २२ जूनपासून सकाळच्या सत्रात सुरू करण्याचे आदेश दिले होते, ज्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
या प्रकरणावरील सुनावणीदरम्यान नागपूर खंडपीठाने शिक्षण संचालकांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांनी काढलेल्या आदेशावर तीव्र नाराजी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालय आणि नागपूर खंडपीठाचे यापूर्वीचे स्पष्ट निर्देश आणि मार्गदर्शक तत्त्वे अस्तित्वात असताना, शिक्षण विभागाने पूर्वपरवानगीशिवाय २२ जूनपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलाच कसा, असा रोकडा सवाल न्यायालयाने उपस्थित केला.
सुनावणीदरम्यान, संपूर्ण राज्यातील शाळांमध्ये एकसमानता आणण्यासाठी सर्व शाळा एकाच दिवशी सुरू करण्याची भूमिका शासनातर्फे मांडण्यात आली. त्यावर न्यायालयाने सरकारला चांगलेच धारेवर धरले. “जर एकसमानता हाच मुख्य निकष होता, तर विदर्भाच्या हवामानाचा विचार करून १५ जून किंवा थेट १ जुलैचा पर्याय का विचारात घेतला गेला नाही?” असा प्रतिप्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. विदर्भातील भौगोलिक परिस्थिती आणि उन्हाची तीव्रता लक्षात न घेता घेतलेला निर्णय अयोग्य असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले.
अखेर न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर शिक्षण संचालकांनी जारी केलेली दोन्ही जुनी परिपत्रके अधिकृतपणे रद्द करण्यात आली आहेत. आता नवीन निर्देशानुसार विदर्भातील सर्व शाळा ३० जूनपासून नियमितपणे सुरू होणार आहेत. या सुधारित निर्णयामुळे विदर्भातील सुमारे २० हजार शाळांमधील लाखो विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षकांना कडक उन्हापासून तात्पुरते संरक्षण मिळाले असून सर्वांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.



