गडचिरोलीविदर्भ

गोकुळनगर परिसराला पूरसदृश संकटातून मिळणार मुक्ती; आयटीआय बायपासवर नाली खोलीकरणाचे काम सुरू

पावसाळ्यात रुग्ण आणि नागरिकांना होणारा त्रास टळणार ; नगराध्यक्ष अन् उपनगराध्यक्षांच्या मार्गदर्शनात तातडीने पाऊल

गडचिरोली : शहरातील आयटीआय बायपास रोड, गोकुळनगर परिसरातील हॉस्पिटलजवळ दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण होत असते. यामुळे रुग्ण, स्थानिक रहिवासी आणि प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन प्रशासनाने या ठिकाणी नाली खोलीकरणाचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. या कामामुळे यंदाच्या पावसाळ्यात पाण्याचा जलदगतीने निचरा होण्यास मोठी मदत होणार असून स्थानिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुसळधार पावसाच्या काळात या मुख्य रस्त्यावर आणि हॉस्पिटल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होत होती. सर्वात जास्त फटका हॉस्पिटलमध्ये ये-जा करणाऱ्या गंभीर रुग्णांना बसत होता. तसेच साचलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत पाण्याचा नैसर्गिक निचरा सुरळीत करण्यासाठी नाली खोलीकरणाच्या कामाला गती दिली आहे.

या जनहितार्थ उपक्रमात गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोरकर आणि नगर परिषद उपाध्यक्ष निखिल चरडे यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला सुरुवात करण्यात आली. कामाच्या प्रत्यक्ष पाहणीदरम्यान नगरसेविका साक्षी बोलुवार, घनश्याम वाढई, शिवराम पुल्लुरी, बृजोष मंडल, आकाश बोलुवार आणि नागया दसरवार प्रामुख्याने उपस्थित होते.

“शहरातील नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देणे हेच विकासाचे खरे उद्दिष्ट आहे. जनतेच्या अशा मूलभूत समस्यांवर तातडीने व प्रभावीपणे उपाययोजना करणे ही लोकप्रतिनिधींची मुख्य जबाबदारी आहे,” असा विश्वास यावेळी लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला.

प्रशासनाने वेळेत काम सुरू केल्याबद्दल गोकुळनगर परिसरातील नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी या मोहिमेचे स्वागत केले आहे. नाली खोलीकरणामुळे यावेळच्या पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येतून तात्पुरती सुटका होईल, अशी आशा स्थानिकांनी व्यक्त केली. सोबतच, शहरातील मूलभूत सुविधांचा दर्जा कायमचा उंचावण्यासाठी भविष्यात या ठिकाणी अधिक मजबूत व कायमस्वरूपी सिमेंट नाली व रस्ता रुंदीकरण करावे, अशी अपेक्षाही नागरिकांनी प्रशासनाकडे व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button