
गडचिरोली : अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेंना संविधान, पेसा कायदा १९९६ आणि स्थानिक रूढी, परंपरा व स्वशासनाच्या तत्त्वानुसार प्राप्त अधिकारांचा वापर करत धानोरा तालुक्यातील झाडापापडा पारंपारिक इलाखा महाग्रामसभा अंतर्गत येणाऱ्या गावांनी गावात दारू व मादक पदार्थांच्या विक्रीवर आणि वापरावर पूर्णपणे बंदी घालणारा ठराव मंजूर केला आहे. या ठरावाच्या कडक अंमलबजावणीसाठी आणि बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे, या मागणीचे निवेदन पेंढरी उप-पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
झाडापापडा ग्रामसभेच्या वतीने आयोजित बैठकीत देशी-विदेशी दारू आणि इतर अमली पदार्थांच्या विक्रीमुळे गावात निर्माण होणाऱ्या गंभीर सामाजिक समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या विक्रीमुळे गावांमधील शांतता, सार्वजनिक आरोग्य आणि सुव्यवस्था धोक्यात येत असल्याबद्दल ग्रामस्थांनी तीव्र चिंता व्यक्त केली. त्यावर मार्ग म्हणून ग्रामसभेने एकमताने दारूविक्रीबंदीचा ठराव संमत करून त्याचे कडक नियम व अटी निश्चित केल्या आहेत.
ग्रामसभेच्या नियमांचे उल्लंघन करून कोणीही बेकायदेशीरपणे दारूची विक्री, वाहतूक किंवा सार्वजनिक शांततेला बाधा आणणारे कृत्य केल्यास, संबंधितांवर कायद्यानुसार तात्काळ योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी झाडापापडा पारंपारिक इलाखा महाग्रामसभा अंतर्गत ग्रामसभा झाडापापडा, सोमलपुर, ढोरगट्टा, पेंढरी, रोपीनगट्टा, पयडी, बोदिन, कोंडेखल, खरगी, कनेली, पावरवेल, पदाबोरगा, हाडापेट, हातझर, रेचा, फुलखल, सावंगी खुर्द, अल्काणार, मोरचूल, बोटेहूर, चिमरीकल, दुर्गापूर, मोहगाव, मासानंदी, सावंगा बूज या ग्रामसभांनी केली आहे.
निवेदन देताना झाडापापडा इलाका समितीचे अध्यक्ष मैनू दुर्वे, उपाध्यक्ष धनेश पवार, सचिव बाजीराव पोटावी, सलागार समितीचे अध्यक्ष देवसाय आतला, उपाध्यक्ष वसंत पोटावी, सदस्य बारसाय दुगा, अशोक उसेंडी, सह सचिव माणिक हिचामी आदी उपस्थित होते.



