गडचिरोलीछत्तीसगडविदर्भ

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचे ८ गुप्त तळ उद्ध्वस्त, २३ जिवंत आयईडीसह शस्त्रास्त्रे जप्त

केंद्रीय राखीव पोलीस दलाची बिजापूर आणि गरियाबंद जिल्ह्यात संयुक्त धडक कारवाई ; ५८ प्रकारच्या वस्तू हस्तगत

गडचिरोली : छत्तीसगडमधील बिजापूर आणि गरियाबंद जिल्ह्यांच्या घनदाट जंगलात सुरक्षा दलांनी माओवाद्यांविरुद्ध राबवलेल्या एका विशेष आणि धडक मोहिमेत १३ जून रोजी मोठे यश संपादन केले आहे. जवानांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने शोधमोहीम राबवून माओवाद्यांचे तब्बल ८ गुप्त तळ शोधून काढत ते पूर्णपणे उद्ध्वस्त केले. या तळांवरून मोठ्या प्रमाणावर घातक शस्त्रास्त्रे आणि २३ जिवंत आयईडी (IED) जप्त करण्यात आले आहेत.

बिजापूर जिल्ह्यातील अद्री, हर्रा आणि मदुमपारा या अतिसंवेदनशील गावांच्या जंगलात माओवादी दबा धरून बसल्याची आणि मोठ्या घातपाताची तयारी करत असल्याची अचूक माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) १९९ व्या बटालियनचे कमांडंट आनंद कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली व सेकंड-इन-कमांड कुमार नीरज यांच्या थेट देखरेखीखाली संयुक्त पथकाने या परिसरात शोधमोहीम हाती घेतली.

या मोहिमेत बी/१९९ कंपनी आणि यंग प्लॅटूनचे नेतृत्व कंपनी कमांडर राजीव कुमार यांनी केले, तर एफ/१९९ कंपनीचे नेतृत्व निरीक्षक के. बी. पांडा यांनी केले. जवानांनी जीवाची पर्वा न करता संपूर्ण परिसराला वेढा घालत माओवाद्यांचे ८ गुप्त तळ शोधून काढले.

उद्ध्वस्त करण्यात आलेल्या माओवाद्यांच्या तळांवरून सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर दारूगोळा आणि साहित्य जप्त केले आहे. यामध्ये १ बॅरल ग्रेनेड लॉन्चर (BGL) रायफल, १ १८-एमएम रायफल आणि १ १२-बोर रायफल. २१ इम्प्रोव्हाइज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाइसेस (IED). आयईडी बनवण्यासाठी लागणारे कॉर्डेक्स वायर, सेफ्टी फ्युज, इलेक्ट्रिक वायर, एअर गनच्या गोळ्या. विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक उपकरणे, नक्षली कपडे आणि दैनंदिन वापराच्या साहित्यासह एकूण ५८ प्रकारच्या वस्तू घटनास्थळावरून हस्तगत करण्यात आल्या आहेत.

दुसऱ्या एका कारवाईत, गरियाबंद जिल्ह्यातील दंडईपाणीच्या जंगलातही सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांचा आणखी एक तळ उद्ध्वस्त केला. येथे जवानांना भूसुरुंगाचा सुगावा लागताच तातडीने बॉम्ब शोधक व नाशक पथकाला (BDDS) पाचारण करण्यात आले. या पथकाने घटनास्थळी पोहोचून ४ किलोचा एक घातक प्रेशर आयईडी आणि एक कुकर आयईडी अत्यंत सुरक्षितपणे शोधून निकामी केला. या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

सुरक्षा दलांच्या या लागोपाठच्या यशस्वी मोहिमांमुळे माओवादी संघटनेला मोठा धक्का बसला असून, सीमावर्ती भागात जवानांची गस्त आणि शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button