
७ शहरांतील अग्निशामक दलांच्या मदतीने आगीवर नियंत्रण; धगधगत्या आगीतून ट्रक आणि कार्यालय वाचवण्यात यश
वरोरा : शहरातील मारडा रस्त्यावर असलेल्या ‘रवी कमल कोटेक्स’ या जिनिंगमध्ये सोमवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत जिनिंगमधील सुमारे २० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, तब्बल १६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास जिनिंगमधील कापसाच्या साठ्याला अचानक आग लागली. कापूस हा अत्यंत ज्वलनशील असल्याने वाऱ्याच्या वेगाने आगीने संपूर्ण परिसर कवेत घेतला. सुरुवातीला तेथील कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीची भीषणता पाहता तात्काळ वरोरा नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात होती. अखेर वरोरा प्रशासनाने आसपासच्या विविध कंपन्या आणि नगरपालिकांच्या अग्निशामक यंत्रणांना पाचारण केले. यामध्ये साई वर्धा पॉवर, जीएमआर भद्रावती, वेकोलि (वणी), ऑर्डनन्स फॅक्टरी (चंद्रपूर). चंद्रपूर महानगरपालिका आणि हिंगणघाट बाजार समिती. या सर्व यंत्रणांच्या अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
आग लागली तेव्हा जिनिंगच्या आवारात आरजे २१, जी ९१४७ क्रमांकाच्या ट्रकमध्ये कापसाच्या गाठी भरण्याचे काम सुरू होते. आगीने ट्रकच्या पुढच्या भागाला गाठले होते, मात्र अग्निशामक दलाने वेळेवर पाणी मारून जळता कापूस बाजूला केल्याने ट्रक सुरक्षित बाहेर काढता आला. तसेच, आग जिनिंगच्या कार्यालयाकडे सरकत असताना कर्मचाऱ्यांनी धाडस दाखवत महत्त्वाचे दस्तावेज आणि साहित्य वेळेत बाहेर काढले.
वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव चंद्रसेन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीत सुमारे २० हजार क्विंटल कापसाचे नुकसान झाले आहे. यामुळे जिनिंग व्यवस्थापनाचे मोठे आर्थिक कंबरडे मोडले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, कापूस उत्पादक आणि जिनिंग व्यवसायातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.



