गडचिरोलीविदर्भ

हिरो शोरूमची इमारत कोसळली; तीन कामगारांचा मृत्यू, तीन जखमी

आरमोरी शहरातील दुर्घटनेमुळे खळबळ; जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

गडचिरोली : जिल्ह्यातील आरमोरी शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील भगतसिंग चौकातील हिरो कंपनीच्या दुचाकी शोरूमची इमारत कोसळून तीन कामगारांचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. आकाश बुराडे (वय २५, रा. निलज, ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर), तहसीन शेख (वय ३०, रा. वडसा, जि. गडचिरोली), अफसान शेख (वय ३२, रा. वडसा, जि. गडचिरोली) अशी मृतांची नावे आहेत. तर दीपक अशोक मेश्राम (वय २३, रा. आरमोरी, जि. गडचिरोली), विलास कवडू मने (वय ५०, रा. आरमोरी, जि. गडचिरोली), सौरभ रवींद्र चौधरी (वय २५, रा. मेंढकी, ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर) हे जखमी झाले आहेत.

आरमोरी येथे पंचायत समिती जवळच्या भगतसिंह वॉर्डात एका जुन्या इमारतीत लालानी यांची हिरो मोटारसायकल कंपनीची शोरुम आहे. ही इमारत धोकादायक स्थितीत असतानाही तेथे शोरुम सुरु होती. आज तेथे कामगार वाहनांची दुरुस्ती करीत होते, तर काही नागरिक वाहनांचे सुटे भाग खरेदी वा नव्या वाहनांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आले होते. संध्याकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास अचानक इमारतीचा मागचा भाग कोसळला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले.

जखमींना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या अपघातात जखमी झालेले विलास मने हे तेथे मेकॅनिक होते. तिन्ही जखमींची हाडे तुटली असून, त्यांच्यावर आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button