गोंदियाविदर्भ

जिल्ह्यात जलसंकट गडद; ६६ जलप्रकल्पांत केवळ १२.४८% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक

मध्यम, लघु व मालगुजारी तलावांतील जलपातळी धोकादायकरीत्या घसरली ; प्रशासनाकडून सिंचनाचा विसर्ग बंद, केवळ पिण्याच्या पाण्यासाठी राखीव

गोंदिया : मान्सूनचे आगमन लांबल्याने आणि उन्हाळ्याच्या तीव्र तडाख्यामुळे जिल्ह्यातील जलस्थिती दिवसेंदिवस अत्यंत गंभीर बनत चालली आहे. गोंदिया पाटबंधारे विभागाने १५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जलसाठा अहवालानुसार, जिल्ह्यातील मध्यम, लघु व स्थानिक स्तरावरील एकूण ६६ जलप्रकल्पांमध्ये सरासरी केवळ १२.४८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. अनेक प्रकल्पांतील पाण्याची पातळी धोकादायकरीत्या घसरल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट निर्माण होण्याची भीती वर्तवली जात आहे.

अहवालानुसार, जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांची एकत्रित संकल्पित क्षमता ११०.५२१ दशलक्ष घनमीटर असून सध्या प्रत्यक्षामध्ये केवळ १३.७९८ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

जिल्ह्यातील ९ मध्यम प्रकल्पांची एकूण संकल्पित क्षमता ९९.७५ दशलक्ष घनमीटर असून, त्यामध्ये सध्या २०.१८ दशलक्ष घनमीटर (२०.२४ टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. प्रमुख मध्यम प्रकल्पांमधील साठा खालीलप्रमाणे आहे: चुलबंद प्रकल्प: ३६.८४ टक्के (सर्वाधिक), बोदलकसा प्रकल्प: २७.०८ टक्के, रेंगेपार प्रकल्प: २३.७० टक्के, खैरबंदा व मानगड: १५.२२ आणि १५.२६ टक्के, चोरखमारा प्रकल्प: १३.१६ टक्के, संग्रामपूर प्रकल्प: ४.२२ टक्के (अत्यंत गंभीर) संग्रामपूर प्रकल्पातील साठा अत्यंत खालावल्यामुळे परिसरातील गावांमध्ये भविष्यात तीव्र पाणीटंचाईचे सावट निर्माण होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील २० लघु प्रकल्पांची एकत्रित क्षमता ६४.५६६ दशलक्ष घनमीटर असून, त्यामध्ये सध्या फक्त ६.५१५ दशलक्ष घनमीटर म्हणजे अवघा १०.११ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. मुंडीपार, पळसगाव, पालडोंगरी आदी प्रकल्पांतील जलपातळी मृत साठ्याजवळ पोहोचली आहे. दुसरीकडे, ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या ३६ माजी मालगुजारी तलावांमध्ये केवळ ८.१५ टक्के (१.९८८ दशलक्ष घनमीटर) साठा शिल्लक राहिला आहे. वाढत्या बाष्पीभवनामुळे ग्रामीण भागातील तलाव वेगाने कोरडे पडत आहेत.

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोकणा, सडक अर्जुनी तालुक्यातील खाडीपार, तसेच गोरेगाव तालुक्यातील तेढा व ताडगाव परिसरातील जलसाठे झपाट्याने कमी होत आहेत. लेंढेझरी, मुंडीपार, पळसगाव आणि पालडोंगरी प्रकल्पांमध्ये कडक उन्हामुळे होणाऱ्या बाष्पीभवनासोबतच जलवाहिन्यांमधील गळतीमुळे उपलब्ध साठ्यावर मोठा परिणाम झाल्याची नोंद अहवालात करण्यात आली आहे. सालेकसा तालुक्यातील खेडेपार आणि आमगाव तालुक्यातील घाटटेमणी बंधाऱ्यांमध्ये उपयुक्त साठा जवळपास संपुष्टात आला आहे.

१ जूनपासून सुरू झालेल्या चालू हंगामात जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने पूर्णपणे दडी मारली आहे. किरकोळ पाऊस झाला असला तरी तो जलसाठ्यात वाढ करण्यासाठी अपुरा ठरला आहे. दमदार पाऊस न झाल्यास खरीप हंगामातील पेरण्या खोळंबण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

सध्याची गंभीर परिस्थिती पाहता पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पांमधून कालव्यांद्वारे केला जाणारा सिंचन विसर्ग पूर्णपणे बंद ठेवला आहे. शिल्लक पाणीसाठा प्रामुख्याने पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. नागरिकांनी पाण्याचा प्रत्येक थेंब काटकसरीने वापरावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button