
रानभाजी तोडण्यासाठी गेलेल्या नागरिकाला दिसला सांगाडा; अर्जुनी मोरगाव पोलिसांकडून तपास सुरू
अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील तावशी ते इटखेडा रोडलगत असलेल्या घनदाट जंगल परिसरात एक मानवी कवटी आढळून आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. अर्जुनी मोरगाव पोलिसांनी या प्रकरणी रीतसर गुन्हा नोंदवून कसून तपास सुरू केला आहे. जंगलात मानवी कवटी सापडल्यामुळे ही घातपाताची घटना असावी का, अशी भीती परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, तावशी येथील रहिवासी हरिचंद अत्यारी बधवा हे नेहमीप्रमाणे तावशी ते इटखेडा रोडवरील जंगलात रानभाजी तोडण्यासाठी गेले होते. जंगलात फिरत असताना एका झुडपी भागात त्यांना अचानक एक मानवी कवटी दिसून आली. निर्जन जंगलात मानवी शरीराचा हा अवशेष पाहून ते प्रचंड भयभीत झाले. त्यांनी तातडीने जंगलातून बाहेर पडून या घटनेची माहिती तावशी गावातील प्रमुखांना दिली.
जंगलात कवटी आढळल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच, फिर्यादी आणि निलज येथील पोलीस पाटलांनी स्थानिक नागरिकांसह तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. प्राथमिक पाहणीत ती मानवी कवटीच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, या घटनेची माहिती अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनला देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून पंचनामा केला आणि ती मानवी कवटी पंचांसमक्ष जप्त करून पुढील फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली आहे. ही मानवी कवटी नेमकी कोणाची आहे? संबंधित व्यक्तीचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला की त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जंगलात फेकला गेला? या सर्व बाजूंनी पोलीस तपास करीत आहेत.
या मानवी कवटीसंदर्भात किंवा परिसरातील, नातेवाईकांमधील कोणत्याही बेपत्ता व्यक्तीबाबत कोणाला काहीही संशयास्पद माहिती असल्यास, त्यांनी तत्काळ अर्जुनी मोरगाव पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.



