
कारंजातील बोरी फाट्याजवळील घटना
वर्धा : सळाखी भरून रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव दुचाकीने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना तालुक्यातील नागपूर-अमरावती मार्गावरील बोरी फाटनजीक गुरुवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास घडली.
राहुल बन्नगरे (३२, रा. धावडी) व प्रवीण रेवतकर (३६, रा. बिहाडी), असे मृतकांची तर रणवीर सोळंकी असे जखमीचे नाव आहे. गत अकरा दिवसांत पाच जणांचा बळी गेला, हे विशेष.
माहितीनुसार राहुल बनगरे, प्रवीण रेवतकर, रणवीर सोळंकी हे तिघे एमएच ३२ डीजी ७७७४ क्रमांकाच्या दुचाकीने घरबांधकाम करण्यासाठी हेटीकुंडी येथे गेले होते. सायंकाळी काम आटोपून गावी परतीच्या मार्गान निघाले असता बोरी फाटा परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या सळाखीने भरलेल्या ट्रकला भरधाव दुचाकीने धडक दिली. या अपघात राहुल बन्नगरे, प्रवीण रेवतकर यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर रणवीर सोळंकी हे गंभीर जखमी झाला.
घटना घटताच स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली, तर लागलीच गंभीर जखमीला नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांची प्रकृती अतिशय नाजूक असल्याचे सांगण्यात आले असून अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहे. याप्रकरणी कारंजा पोलिसात अपघाताची नोंद घेतली असून पुढील तपास पोलिस करीत आहे.



