
५० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना खाजगी हस्तक रंगेहात अटक; गडचिरोली वनवर्तुळात प्रचंड खळबळ
गडचिरोली : जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील पेडीगुडम वनपरिक्षेत्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक धडक कारवाई केली आहे. एका खाजगी फर्निचर मार्ट व्यावसायिकाकडून वनविभागाच्या कारवाईची भीती दाखवून तब्बल ३ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह, वनरक्षक आणि एका खाजगी इसमावर एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना खाजगी मध्यस्थाला एसीबीच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील वनविभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास कटकू, वनरक्षक नितेश मडावी आणि खाजगी मध्यस्थ प्रदीप मंडल अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
सविस्तर वृत्त असे की, मुलचेरा तालुक्यातील पेडीगुडम वनपरिक्षेत्रातील एका खाजगी फर्निचर मार्ट व्यावसायिकाला वनविभागाकडून कायदेशीर कारवाई करण्याची भीती दाखवण्यात आली होती. ही कारवाई टाळण्यासाठी आणि व्यवसायात कोणतीही अडचण निर्माण न करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास कटकू, वनरक्षक नितेश मडावी आणि त्यांचा खाजगी हस्तक प्रदीप मंडल यांनी संगनमत करून तक्रारदाराकडे ३ लाख रुपयांच्या खंडणीची आग्रही मागणी केली होती.
तक्रारदार व्यावसायिकाची लाच किंवा खंडणी देण्याची अजिबात इच्छा नसल्याने, त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) रीतसर तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने तात्काळ या तक्रारीची गोपनीय पडताळणी केली असता, अधिकाऱ्यांनी खाजगी इसमाच्या माध्यमातून खंडणी मागितल्याची बाब निष्पन्न झाली. त्यानुसार, खंडणीचा पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपये देण्याचे ठरले. एसीबीने मुलचेरा परिसरात अत्यंत गुप्ततेने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची रोख रक्कम स्वीकारताना खाजगी मध्यस्थ प्रदीप मंडल याला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.
खाजगी हस्तक प्रदीप मंडल याला पकडल्यानंतर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास कटकू आणि वनरक्षक नितेश मडावी यांची काळी भूमिका पूर्णपणे उघड झाली आहे. एसीबीने या दोन्ही वनअधिकाऱ्यांना तातडीने तपासाच्या चक्रात घेतले असून, त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.
“शासकीय पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करून खाजगी इसमाच्या माध्यमातून सर्रास खंडणी उकळणाऱ्या या रॅकेटचा एसीबीने पर्दाफाश केला असून, या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे,” अशी माहिती एसीबीच्या सूत्रांनी दिली आहे. या कारवाईमुळे लाचखोर आणि खंडणीखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.



