
गंभीर गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला ‘जनमिलिशिया’चा सदस्य अटकेत ; सह-आरोपीला आधीच झाली आहे जन्मठेप
गडचिरोली : जिल्ह्यातील माओवाद आता जवळजवळ संपुष्टात आला असून, पोलीस दलाने माओवादविरोधी अभियानांतर्गत आणखी एक महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली, मागील ११ वर्षांपासून पोलिसांना चकवा देऊन फरार असलेल्या एका कट्टर नक्षल समर्थक आरोपीला १७ जून रोजी अत्यंत शिताफीने ताब्यात घेण्यात आले. बापू व्यंकटी जनगम (रा. नडीकुडा) असे अटक करण्यात आलेल्या नक्षल समर्थकाचे नाव आहे. गंभीर गुन्ह्यांची पार्श्वभूमी असलेला हा आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील ‘ग्राम रक्षक दल’ (GRD) या यादीत समाविष्ट होता.
सविस्तर वृत्त असे की, आरोपी बापू जनगम हा माओवाद्यांना रसद व इतर मदत पुरविणाऱ्या ‘जनमिलिशिया’ या नक्षलवादी संघटनेशी संबंधित होता. तो दीर्घकाळापासून फरार असल्याने गडचिरोली पोलीस त्याचा शोध घेण्यासाठी सातत्याने विशेष मोहिमा राबवत होते. १७ जून रोजी पोलीस स्टेशन असरल्लीच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, आरोपी बापू जनगम हा आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी छुप्या पद्धतीने नडीकुडा गावात आला आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून गावाला वेढा घातला आणि शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान नडीकुडा येथील शेतशिवार परिसरात लपून बसलेल्या आरोपीला पोलिसांनी अत्यंत शिताफीने चारी बाजूंनी घेरून अटक केली.
अटक करण्यात आलेला आरोपी बापू जनगम हा विविध ५ गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांना पाहिजे होता. त्याच्यावर पोलीस स्टेशन असरअल्ली येथे १) अप क्र. १०/२००७: कलम ३०४, ३४ भादंवि. २) अप क्र. १३/२०११: कलम ३५३, ३३२, ४२७, १४३, १४७, १४९ भादंवि. ३) अप क्र. ४२/२०११: कलम ३०७, ३५३, ३७९, ४२७, १४३, १४७, १४९ भादंवि. (खुनाचा प्रयत्न आणि शासकीय कामात अडथळा). ४) अप क्र. ०३/२०१५: कलम ३५३, ३३७, ३३८, ३४ भादंवि. ५) अप क्र. ०६/२०१५: कलम ३०२, ३४ भादंवि. (खून). गुन्हे दाखल आहेत.
विशेष म्हणजे, २०१५ मधील खुनाच्या (कलम ३०२) गुन्ह्यात तो गेल्या ११ वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देत होता. याच गुन्ह्यातील त्याच्या सह-आरोपीला गडचिरोली सत्र न्यायालयाने यापूर्वीच जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे.
दीर्घकाळ फरार असलेल्या या आरोपीचा माग काढण्यासाठी गडचिरोली पोलीस तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती संकलन आणि स्थानिक नेटवर्कचा वापर करत होते. अटक केल्यानंतर आरोपीला माननीय न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाच्या आदेशान्वये त्याची थेट न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
सदरची कारवाई गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) हर्षवर्धन बी. जे., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे आणि सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात पोस्टे असरअल्लीचे प्रभारी अधिकारी सपोनि. योगिराज जाधव, पोउपनि. प्रसाद पवार व पोलीस अंमलदारांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.



