क्राईमगडचिरोलीविदर्भ

प्रतिबंधित सुगंधित तंबाखूसह २.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त ; पाच आरोपींना अटक

गडचिरोली : महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या सुगंधित तंबाखूची शहरात मोठ्या प्रमाणावर साठवणूक करून अवैध विक्री करणाऱ्या रॅकेटचा गडचिरोली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलीस प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, गोकुलनगर परिसरातील दोन ठिकाणी केलेल्या धडक कारवाईत २ लाख १५ हजार ७१० रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू व कच्चा माल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून, या धडक कारवाईने अवैध तंबाखू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार २० जून रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, गोकुलनगर येथील विवेक अवधराम गुप्ता याने आपल्या राहत्या आणि भाड्याच्या घरात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित सुगंधित तंबाखू साठवून ठेवल्याचे समोर आले. पोलिसांनी पंचासमक्ष दोन्ही ठिकाणी छापा टाकून ईगल हुक्का शिशा तंबाखू: ८२ पॅकेट्स, कच्ची सुपारी: ३२३ किलो, ईगल शिशा खर्रा पन्नी व इतर साहित्य असा एकूण २,१५,७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी जितेंद्र कुंजाम यांच्या फिर्यादीवरून गडचिरोली पोलीस ठाण्यात विवेक अवधराम गुप्ता (२१), अरविंद अवधराम गुप्ता (३१), यश सुभाष चव्हाण (३१), अजय सतिश गेडाम, अनिकेत घनश्याम बांबोळे (२७) या पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस स्टेशन गडचिरोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद मेश्राम यांच्या नेतृत्वातील पथकाने ही धाडसी मोहीम फत्ते केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल आगलावे करत आहेत.

गडचिरोली शहरात अवैध तंबाखूची विक्री करून तरुणाईच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाया सुरूच राहतील, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button