गोंदियाविदर्भ

“रक्तदान-जीवनदान” : जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदान शिबीर आयोजकांचा गौरव

गोंदिया : दरवर्षी 14 जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून पाळला जातो. या दिनाचे औचित्य साधुन बाई गंगाबाई रक्तकेंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया येथे MET हॉलमध्ये जिल्ह्यातील रक्तदान शिबीर आयोजकांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून के.टी.एस. रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले, बाई गंगाबाई रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. नितिका पोयाम तसेच विकृतीशास्त्र विभागप्रमुख व रक्तकेंद्र प्रभारी डॉ. अरविंद राठोड उपस्थित होते.

जिल्हाभरातील सुमारे 150 रक्तदान शिबीर आयोजकांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या समाजहिताच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात डॉ. घोरपडे यांनी रक्तपेढीच्या दैनंदिन कार्यात रक्तदान शिबीर आयोजकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले. तसेच मागील वर्षी दिलेल्या आश्वासनानुसार कंपोनंट सेपरेशन युनिट सुरू करण्यात आले असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी रक्त कोणत्याही कारखान्यात तयार करता येत नसल्यामुळे रक्तदान हे अत्यंत महान व जीवनदायी कार्य असल्याचे सांगत सर्वांना रक्तदानासाठी प्रेरित केले.

कार्यक्रमास विविध विभागातील वरिष्ठ प्राध्यापक, विकृतीशास्त्र विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक विजय बिसेन, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अमित मुन, अमित ठवरे, युवराज जांभुळकर तसेच इतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्वेता पंढरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. पुजा बांबोर्डे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button