
गोंदिया : नातेवाइकाचे अंत्यसंस्कार आटोपून घरी जात असताना भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम दासगाव येथे गुरुवारी (दि. २५) रात्री ९:३० वाजता दरम्यान ही घटना घडली. महेंद्र यशवंत राऊत (२५, रा. ढाकणी) असे अपघातातील मृत तरुणाचे नाव आहे. मृत
महेंद्र राऊत हा त्याचा मावसभाऊ अशोक देवचंद वाघाडे (२८, रा. पांढराबोडी) याच्यासोबत दुचाकी क्रमांक एमएच ३५-एयू ९४२२ ने नातेवाइकाचा अंत्यसंस्कार आटोपून ग्राम ढाकणीकडे परत जात होता. मात्र ग्राम दासगाव येथे भरधाव वेगात आलेल्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात महेंद्र राऊत रस्त्यावर फेकला गेल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अशोक वाघाडे याला किरकोळ दुखापत झाली. अपघात घडवून ट्रॅक्टरचालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनास्थळी पोहोचलेल्या नातेवाइकांना रस्त्याच्या कडेला गटारात अडकलेला ट्रॅक्टर व ट्रॉली क्रमांक एमएच ३५-एजी ५६२५ दिसून आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी केटीएस जिल्हा रुग्णालयात पाठविला. यशवंत चैतराम राऊत यांच्या तक्रारीवरून अज्ञात ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



