
मोहा आणि तेंदूपत्ता संकलनाच्या काळात सतर्क राहण्याचे आवाहन ; वणव्यामुळे निसर्गासह अर्थव्यवस्थेचेही होते अतोनात नुकसान
भंडारा : जंगल ही केवळ झाडांची गर्दी नसून ती आपल्या पर्यावरणाचा आणि स्थानिक रोजगाराचा मुख्य आधार आहे. मात्र, दरवर्षी उन्हाळ्यात लागणाऱ्या वनवणव्यामुळे मौल्यवान वनसंपदा आणि वन्यजीवांचे अधिवास नष्ट होत आहेत. हे संकट रोखण्यासाठी ‘सेवा’ संस्थेच्या वतीने नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात विशेष जनजागृती मोहीम आणि कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. “वनवणवा रोखणे ही केवळ वन विभागाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे,” असे आवाहन सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार यांनी यावेळी केले.
कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सावन बहेकार यांनी सांगितले की, जंगल जाळल्यामुळे केवळ प्रदूषण होत नाही, तर त्याचा थेट परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होतो. आगीमुळे ताज्या पालवीचे नुकसान होऊन तेंदूपत्त्याचे उत्पादन घटते. तसेच झाडांची पुनरुत्पादन क्षमता कमी झाल्यामुळे भविष्यातील उत्पन्नावर गदा येते. याशिवाय औषधी वनस्पती, कीटक आणि पक्षी यांचे अधिवास आगीत खाक होतात, ज्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडतो.
मोहाच्या हंगामात लागणारी आग रोखण्यासाठी कार्यशाळेत आधुनिक उपाययोजना सुचवण्यात आल्या: ब्लोअर मशीनचा वापर: मोहाच्या झाडाखालील पालापाचोळा न जाळता तो ब्लोअर मशीनच्या साहाय्याने साफ करावा. जिओ-टॅगिंग (Geo-tagging): गावनिहाय मोहाच्या झाडांची डिजिटल नोंद ठेवून संवेदनशील क्षेत्रांची ओळख पटवण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. नोंदणी: मोहा वेचणाऱ्या संकलकांची यादी, संपर्क माहिती आणि झाडांची संख्या यांची तपशीलवार नोंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत नवेगाव, बोंडे, डोंगरगाव, पिटेझरी, नागझिरा, उमरझरी व कोका या सातही वनपरिक्षेत्रांमध्ये ही कार्यशाळा पार पडली. यामध्ये ईडीसी (EDC), संयुक्त वन व्यवस्थापन समिती (JFM) आणि सामूहिक वनहक्क समितीच्या सदस्यांना वनवणवा नियंत्रणाचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच आगीशी प्रत्यक्ष झुंज देणाऱ्या ‘फायर वॉचर’च्या सुरक्षिततेसाठी विशेष काळजी घेण्याचे निर्देशही देण्यात आले.
या मोहिमेला नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक पियुषा जगताप (IFS) आणि उपसंचालक प्रितमसिंह कोडापे (IFS) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच जिल्ह्यातील विविध सहाय्यक वनसंरक्षक आणि वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी (RFO) प्रत्यक्ष उपस्थित राहून ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.
“आपल्या एका छोट्याशा सतर्कतेमुळे जंगलाचे मोठे नुकसान टाळता येऊ शकते,” असा विश्वास या कार्यशाळेच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला. नागरिकांनी कुठेही आग लागल्याचे दिसल्यास तात्काळ वन विभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



