
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या हस्ते उद्घाटन ; ग्रामीण भागातील रुग्णांचा वेळ आणि खर्च वाचणार
आरमोरी : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील किडनी आजारग्रस्त रुग्णांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. उपजिल्हा रुग्णालय, आरमोरी येथे ‘इंडियन पब्लिक हेल्थ स्टँडर्ड्स’ (IPHS) अंतर्गत अद्ययावत डायलिसिस सेवांचा रीतसर शुभारंभ करण्यात आला आहे. या सेवेमुळे आता आरमोरी परिसरातील रुग्णांना डायलिसिससाठी जिल्हा मुख्यालय किंवा महागड्या खासगी रुग्णालयांकडे धाव घेण्याची गरज उरणार नाही.
सदर डायलिसिस केंद्राचे उद्घाटन गडचिरोली सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “आरोग्य विभागाचे मुख्य उद्दिष्ट हे सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या दारापर्यंत अद्ययावत आणि जीवनरक्षक सेवा पोहोचवणे हे आहे. आरमोरी येथे सुरू झालेली ही सेवा जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणाच्या दृष्टीने एक मोठे पाऊल आहे.”
पूर्वी आरमोरी आणि आसपासच्या गावांमधील किडनी रुग्णांना डायलिसिस करण्यासाठी गडचिरोली किंवा नागपूरसारख्या शहरांमध्ये जावे लागत असे. यामुळे रुग्णांना शारीरिक त्रासासोबतच आर्थिक फटकाही सहन करावा लागत होता. आता स्थानिक उपजिल्हा रुग्णालयातच ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांचा वेळ, प्रवास आणि उपचाराचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
याप्रसंगी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बागराज धुर्वे, आरमोरी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार कोरेटी, वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया उईके, तसेच रुग्णालयातील अन्य वैद्यकीय अधिकारी, परिसेविका, परिचारिका आणि कर्मचारी उपस्थित होते.
शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांच्या माध्यमातून ही सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. अद्ययावत यंत्रसामग्री आणि तज्ज्ञ मनुष्यबळाच्या देखरेखीखाली हे डायलिसिस केंद्र कार्यरत राहणार असून, गरजू रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी केले आहे.



