
गोंदिया : कोणतीही सूचना किंवा इशारा न देता रस्त्याच्या मधोमध उभ्या करण्यात आलेल्या ट्रेलरला दुचाकी धडकून घडलेल्या अपघातात तरुण ठार झाला. तिरोडा पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम सरांडी येथील बसस्थानकाजवळ बुधवारी (दि.२४) सायंकाळी ७ ते ७:१५ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. अमोल गणपत वाटकर (२५, रा. वटी, भंडारा) असे मृत तरुणाचे नाव आहे.
तिरोडा-तुमसर मार्गावरील ग्राम सरांडी येथील बसस्थानकाजवळ ट्रेलर क्रमांक एमएच ४०-सीडी ३६७२ चालकाने ट्रेलर रस्त्याच्या मधोमध उभा केला होता. मात्र, वाहनामागे कोणतेही परावर्तक चिन्ह, इशारा किंवा धोक्याची सूचना देणारी व्यवस्था केली नव्हती. दरम्यान सरांडीकडून येत असलेल्या दुचाकीस्वार अमोल वाटकर याची दुचाकी ट्रेलरच्या मागील भागावर जोरात आदळली. या धडकेत अमोल गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शैलेश किशोर फोफस्कर (२८, रा. सरांडी) यांच्या तक्रारीवरून ट्रेलर चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८५ व १०६ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



