गडचिरोलीविदर्भ

आरमोरीत ‘स्मार्ट मीटर’ विरोधात महावितरणला घेराव; शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन

आझाद समाज पार्टीचा सक्रिय पाठिंबा; निर्णय रद्द करेपर्यंत लढा अधिक तीव्र करण्याचा जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांचा इशारा

आरमोरी : स्मार्ट मीटरच्या सक्तीच्या विरोधात ३० जून रोजी आरमोरी येथील महावितरण कार्यालयावर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या वतीने संयुक्तपणे भव्य ‘घेराव’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला आझाद समाज पार्टीने जाहीर पाठिंबा देत थेट मैदानात उडी घेतली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड आणि युवा आघाडी जिल्हाध्यक्ष विकी खोब्रागडे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. स्मार्ट मीटर हटवून पूर्वीचेच मीटर पूर्ववत बसवण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्यामुळे महावितरण परिसरात चांगलाच तणाव निर्माण झाला होता.

या भव्य आंदोलनात आरमोरी शहर आणि परिसरातील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. स्मार्ट मीटर बसवल्यापासून वीजबिलात भरमसाठ आणि अनियंत्रित वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

माध्यमांशी बोलताना आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड म्हणाले, “स्मार्ट मीटरविरोधात आज संपूर्ण महाराष्ट्रात जनतेचा प्रचंड रोष आहे. या जनविरोधी निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. यापूर्वी आम्ही २५ जून रोजी आझाद समाज पार्टी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने गडचिरोली येथे महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर ‘हल्लाबोल’ आंदोलन केले होते. जनतेच्या हक्कासाठी आरमोरी येथील आंदोलनातही आम्ही नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.”

राज बन्सोड यांनी आंदोलनाचे निमित्त साधून सत्ताधारी पक्षांच्या दुटप्पी भूमिकेवर आणि सरकारवर कडक शब्दांत प्रहार केला. ते म्हणाले, “आजचे हे आंदोलन सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. सरकारमध्ये निर्णय घेण्याची ताकद असलेल्या पक्षांनाच आज स्वतःच्या सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आणि मोठी शोकांतिका आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेच्या भावना लक्षात घेऊन स्मार्ट मीटरचा हा निर्णय तातडीने रद्द करण्यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा.”

हा प्रश्न केवळ स्थानिक पातळीवरील आंदोलनाने सुटणारा नाही, असे सांगत बन्सोड यांनी मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाकडे लक्ष वेधले. अधिवेशनात विरोधी पक्षांनी हा मुद्दा प्रभावीपणे मांडून सरकारला धारेवर धरावे आणि हा निर्णय मागे घेण्यासाठी भाग पाडावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच, जोपर्यंत महावितरण आणि सरकार हा निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत आझाद समाज पार्टी जनतेच्या हक्कासाठी रस्त्यावरचा संघर्ष अधिक तीव्र करेल, असा इशाराही त्यांनी शेवटी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button