गडचिरोलीविदर्भ

पुसुकपल्ली जि.प. शाळेत प्रवेशोत्सवाचा अनोखा थाट; सजविलेल्या बैलबंडीवरून विद्यार्थ्यांची वाजतगाजत मिरवणूक

उपवनसंरक्षक दिपाली तलमले यांच्या हस्ते नवागत चिमुकल्यांचे स्वागत ; ढोल-ताशांच्या गजराने दुमदुमले गाव

अहेरी : राज्यभरात मंगळवारपासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असून, अहेरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पुसुकपल्ली येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे अत्यंत पारंपरिक आणि अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल गोडी निर्माण व्हावी आणि पालकांमध्ये सकारात्मक संदेश जावा या उद्देशाने राबविलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चा सुरू आहे.

या विशेष शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाला भामरागड वनविभागाच्या उपवनसंरक्षक दिपाली तलमले प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. शाळेच्या पहिल्या पायरीवर पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्यांचे तलमले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देणे, कपाळावर यशाचा टिळा लावणे आणि शालेय साहित्याचे वाटप करून उत्साहात स्वागत करण्यात आले.

स्वागत सोहळ्यानंतर या प्रवेशोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरली ती विद्यार्थ्यांची गावातून काढण्यात आलेली मिरवणूक. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सुंदर सजविलेल्या बैलबंडीवर बसवून ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण पुसुकपल्ली गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण गाव रस्त्यावर उतरले होते. गावकऱ्यांनी ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत केले आणि बैलबंडीवरील चिमुकल्यांवर प्रेमाने पुष्पवृष्टी करत त्यांना शैक्षणिक प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.

शाळेने आयोजित केलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे पहिल्याच दिवशी मुलांच्या मनातील शाळेविषयीची भीती पूर्णपणे दूर झाली. सजवलेली बैलबंडी आणि ढोल-ताशांच्या आवाजामुळे शाळेचे वातावरण जणू एखाद्या उत्सवासारखे झाले होते, ज्यामुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद आणि आत्मविश्वास दिसून येत होता. पालकांनीही शाळेच्या या कल्पकतेचे तोंडभरून कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे मुलांचा शाळेकडे जाण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक बनतो, अशी प्रतिक्रिया उपस्थित पालकांनी दिली.

याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका रागीवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद भोयर, समितीचे सर्व सदस्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, तसेच मोठ्या संख्येने पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना रोज शाळेत येण्याचे, शिस्तीचे पालन करण्याचे आणि स्वतःच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणालाच सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले.

पहिल्याच दिवशी झालेल्या या ऐतिहासिक स्वागतामुळे पुसुकपल्ली येथील जिल्हा परिषद शाळेने इतर शाळांसमोर एक आदर्श पायंडा घालून दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button