
१९८६ पासून तुटपुंज्या मानधनावर सेवा; वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाची डोळेझाक; कामगारांचा संताप अनावर.
गडचिरोली : गेल्या ३९ वर्षांपासून ग्रामीण जनतेची तहान भागवण्यासाठी अहोरात्र राबणाऱ्या हातपंप देखभाल व दुरुस्ती कामगारांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने मानधन वाढीच्या मागणीकडे सपशेल पाठ फिरवल्याने, अखेर सोमवार, दि. १६ फेब्रुवारी २०२६ पासून हातपंप देखभाल दुरुस्ती व कामगार संघटनेच्या (आयटक) वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, हे कामगार १९८६ पासून अत्यंत अल्प मानधनावर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कार्यरत आहेत. वाढत्या महागाईच्या काळात उदरनिर्वाह करणे अशक्य झाल्याने संघटनेने २१ ऑक्टोबर २०२४ पासून ते ३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित विभागाकडून केवळ आश्वासनापलीकडे काहीही मिळाले नाही. या प्रशासकीय उदासिनतेमुळेच शेवटी कामगारांना ‘आमरण उपोषणा’चे टोकाचे पाऊल उचलावे लागले आहे.
कामगारांनी एक महत्त्वाचा तांत्रिक मुद्दा उपस्थित केला आहे. १५ नोव्हेंबर २०२४ च्या निर्णयानुसार, जि.प. मधील शाखा अभियंता (यांत्रिकी) आणि मदतनीस यांचे वेतन व निवृत्तीवेतन आता थेट शासनामार्फत दिले जाते. यामुळे जिल्हा परिषदेच्या तिजोरीवरील मोठा आर्थिक भार कमी झाला आहे. हा वाचलेला निधी अल्प मानधनावरील कामगारांच्या वाढीसाठी वापरणे आता सहज शक्य असतानाही, प्रशासन ‘निधीची कमतरता’ असल्याचे सांगून दिशाभूल करत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.
कामगारांना केवळ मानधनाची चिंता नाही, तर मिळणारे तुटपुंजे मानधनही वेळेवर मिळत नाही. दर महिन्याला ५ तारखेच्या आत पगार व्हावा ही साधी मागणीही पूर्ण होत नसल्याने अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. हातपंप दुरुस्तीव्यतिरिक्त इतर कामे लादली जात असल्याने कामाचा ताणही वाढला आहे.
मानधन वाढ: वाढत्या महागाईनुसार मानधन २५ ते ३० हजार रुपये करण्यात यावे. कायमस्वरूपी सेवा: ट्रायसेम यांत्रिकी कामगारांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे. वेळेवर वेतन: दर महिन्याच्या ५ तारखेच्या आत मानधन नियमित अदा करावे. सुट्ट्या व सवलती: वर्षाला १५ पगारी सुट्ट्या मिळाव्यात. गणवेश भत्ता: दरवर्षी २,५०० रुपये गणवेशासाठी मिळावेत. करार शिथिलता: जाचक अटी व शर्ती शिथिल करून कामाचे स्वरूप निश्चित करावे. या प्रमुख मागण्यांसाठी हातपंप दुरुस्ती कामगार उपोषणावर बसले आहेत.
या उपोषणात निलकंठ साखरे, जर्नाधन गावतूरे, गुरुदेव कुमरे, देविदास दुर्गे, पोचन्ना चेकला यांच्यासह सुमारे ६० कामगार सहभागी झाले आहेत. या आंदोलनाला ‘आयटक’चे जिल्हाध्यक्ष कॉ. देवराव चवळे, सहसचिव कॉ. प्रकाश ठलाल आणि सचिव कॉ. जलीलखाँ पठाण यांनी पाठिंबा देत, होणाऱ्या गंभीर परिणामांची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असेल, असा इशारा दिला आहे.



