
सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
गडचिरोली : जिल्ह्यातील अतिशय दुर्गम भागातील कमलापूर येथे असलेल्या राज्यातील एकमेव हत्तीकॅम्पला ‘राज्य पर्यटनस्थळ’ म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या घोषणेमुळे या भागाचा विकास होईल आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळतील, असे ताटीकोंडावार यांनी म्हटले आहे.
कमलापूर येथील हत्तीकॅम्प राज्यातील पर्यटकांना आणि वन्यजीव प्रेमींना नेहमीच आकर्षित करत असतो. मात्र, या ठिकाणाला अद्याप पर्यटनस्थळाचा अधिकृत दर्जा मिळालेला नाही. त्यामुळे या परिसराचा म्हणावा तसा विकास होऊ शकलेला नाही, असे ताटीकोंडावार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
ताटीकोंडावार यांनी सांगितले की, २०१६ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी या हत्तीकॅम्पला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न केले होते आणि त्यासाठी मोठा निधीही उपलब्ध करून दिला होता. परंतु, २०१९ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर या कामाकडे दुर्लक्ष झाले. मध्यंतरी हत्तींना गुजरातमध्ये हलवण्याच्या हालचालीही सुरू झाल्या होत्या, मात्र वन्यप्रेमींच्या विरोधामुळे आणि उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे हे स्थलांतर थांबले.
कमलापूर हत्तीकॅम्पला ‘राज्य पर्यटनस्थळ’ म्हणून मान्यता मिळाल्यास महाराष्ट्र, भारत आणि परदेशातील पर्यटकांची गर्दी वाढू शकते. यामुळे या भागात नौकाविहार (बोटिंग), निवास व्यवस्था आणि इतर सुविधा निर्माण होतील, ज्यातून स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. याशिवाय, राज्याच्या महसुलातही वाढ होण्यास मदत होईल. त्यामुळे या हत्तीकॅम्पला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊन या भागाच्या विकासाला चालना देण्याची मागणी ताटीकोंडावार यांनी पुन्हा एकदा केली आहे.



