
२७ टक्के पेरण्या पूर्ण
नागपूर : जून महिन्यातील प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर नागपूर विभागात मागील तीन दिवसांपासून सर्वदूर समाधानकारक पावसाला सुरुवात झाली आहे. अल-निनोच्या प्रभावामुळे यावर्षी अनियमित व अपुऱ्या पावसाची शक्यता वर्तवली जात असतानाच, निसर्गाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या दमदार पावसामुळे विभागात खरीप हंगामाच्या पेरण्यांना वेग आला असून, आतापर्यंत विभागातील एकूण क्षेत्राच्या २७ टक्के पेरण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत.
नागपूर विभागात यंदाच्या खरीप हंगामात एकूण १८ लाख ९५ हजार ९१० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जून महिना कोरडा गेल्यामुळे शेतकरी चिंतेत होते; मात्र मागील तीन दिवसांतील पावसामुळे आतापर्यंत ५ लाख १६ हजार ६५८ हेक्टर क्षेत्रात (२७ टक्के) पेरण्या आटोपल्या आहेत.
जिल्हानिहाय पेरणीची आकडेवारी पाहता, वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक ४५ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यात ४० टक्के, तर नागपूर जिल्ह्यात २९ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून इतर जिल्ह्यांतही पेरणीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
मागील तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे नागपूर विभागात आतापर्यंत सरासरी १६५.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात पावसाचा जोर सर्वाधिक राहिला. वर्धा जिल्हा (सरासरी १९४.५ मिमी): जिल्ह्यात तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे नोंदवला गेला – आष्टी (२७६ मिमी), कारंजा (२५६.४ मिमी), आर्वी (२६४.३ मिमी), देवळी (२०१.४ मिमी), वर्धा (१८४.४ मिमी), सेलू (१६४.५ मिमी), समुद्रपूर (१५६.४ मिमी) आणि हिंगणघाट (१३४.५ मिमी). नागपूर जिल्हा (सरासरी १७१.४ मिमी): नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तब्बल ८७.५४ टक्के पाऊस पडला आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस रामटेक (२३८.१ मिमी), कळमेश्वर (२३५.२ मिमी), काटोल (२२९.१ मिमी) आणि पारशिवनी (२२६.९ मिमी) तालुक्यात झाला. तर नागपूर शहर (१३५.१ मिमी), नागपूर ग्रामीण (१५६.२ मिमी) व कुही तालुक्यात सर्वात कमी (१०२.८ मिमी) पावसाची नोंद झाली.
विभागातील इतर जिल्ह्यांतही समाधानकारक पाऊस झाला असून गोंदिया जिल्हा: १८८.७ मिमी, गडचिरोली जिल्हा: १६५.६ मिमी, चंद्रपूर जिल्हा: १५६.५ मिमी, भंडारा जिल्हा: ११५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील तीन दिवसांपासून पडत असलेल्या या सततच्या आणि सर्वदूर पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला असून, बळीराजा सुखावला आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना जमिनीची ओल बघूनच पेरणी करण्याचे आवाहन केले आहे.



