
उपचाराचा सर्व खर्च शासन उचलणार ; प्रकृतीची विचारपूस करत दिला धीर
गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी महामार्गावर गुरुवारी झालेल्या भीषण अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या दोन युवकांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील किंग्सवे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली आणि त्यांना धीर दिला.
सहपालकमंत्री जयस्वाल यांनी अपघातग्रस्त युवक क्षितिज तुळशीदास मेश्राम आणि आदित्य धनंजय कोहपरे यांच्याशी थेट संवाद साधला. या कठीण परिस्थितीत त्यांना मानसिक आधार देत जयस्वाल म्हणाले, “तुमच्या प्रकृतीसाठी सर्वतोपरी वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येतील. शासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.”
त्यांनी किंग्सवे हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून रुग्णांच्या सध्याच्या प्रकृतीची माहिती घेतली. त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती जाणून घेतल्यानंतर, जयस्वाल यांनी रुग्णांना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश रुग्णालय प्रशासनाला दिले.
यावेळी बोलताना जयस्वाल यांनी सांगितले की, “अपघातानंतर जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि शासन यंत्रणा रुग्णांच्या सेवेत तत्पर आहेत.” राज्य सरकारकडून या घटनेतील मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, जखमींच्या उपचाराचा पूर्ण खर्च शासन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. अपघातातील पीडितांच्या पुनर्वसनासाठी शासन कटिबद्ध असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.



