गडचिरोलीविदर्भ

गडचिरोलीच्या बांबू उद्योगाचा राज्यस्तरावर गौरव; ‘आदिवासी बांबू प्रक्रिया सहकारी संस्थे’ला सहकार ग्रामविकास पुरस्कार

गडचिरोली : गडचिरोलीसारख्या दुर्गम आदिवासी भागातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बांबू उद्योगाच्या माध्यमातून नवी दिशा देणाऱ्या ‘गडचिरोली जिल्हा आदिवासी बांबू प्रक्रिया सहकारी संस्थे’ला यंदाचा प्रतिष्ठेचा ‘सहकार ग्रामविकास पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित सहकार गौरव पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी आणि पदाधिकाऱ्यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला.

माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेल्या या संस्थेने स्थानिक शेतकरी आणि सुशिक्षित युवक-युवतींना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. सहकारी साखर कारखान्यांच्या धर्तीवर बांबूवर प्रक्रिया करून बांबू फ्लोअरिंग टाइल्स आणि फर्निचरसारखी मूल्यवर्धित उत्पादने तयार करणारा हा राज्यातील पहिलाच सहकारी प्रयोग ठरला आहे. सुमारे ८७० सभासदांना सोबत घेऊन ही संस्था ग्रामीण औद्योगिकीकरणाचे एक आदर्श मॉडेल म्हणून उदयाला आली आहे.

या पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, आ. प्रवीण दरेकर, आ. विनय कोरे, मंत्री मंगलप्रसाद लोढा, मंत्री उदय सामंत, आ. प्रसाद लाड आणि विद्याधर अनास्कर यांच्यासह सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

दुर्गम भागातील नैसर्गिक संसाधनांचे मूल्यवर्धन, शेतकरी सक्षमीकरण आणि आदिवासी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी या संस्थेने केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे मान्यवरांनी यावेळी नमूद केले. या पुरस्कारामुळे गडचिरोलीच्या बांबू उद्योगाला केवळ राज्यस्तरावरच नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावर एक नवी ओळख मिळाली आहे. स्थानिक पातळीवर सहकाराच्या माध्यमातून विकासाची नवी गाथा लिहिणाऱ्या या संस्थेच्या कार्याचे गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button