
गडचिरोली : येथील गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत यशाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. वर्ग आठवीच्या चार विद्यार्थ्यांनी भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे, तर सहावीच्या एका विद्यार्थ्याने वडसा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या शैक्षणिक लौकिकात भर घातली आहे.
गोंडवाना सैनिकी विद्यालयातील कॅडेट मास्टर संस्कार नागपुरे, कॅडेट मास्टर राघव भांडेकर, कॅडेट मास्टर प्रेम कुनघाडकर आणि कॅडेट मास्टर यथार्थ शेंडे या चार विद्यार्थ्यांनी आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून, त्यांची भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी निवड झाली आहे. या यशासोबतच, वर्ग सहावीत शिकणाऱ्या कॅडेट मास्टर संकेत बनसोड याने पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत वडसा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
विद्यार्थ्यांचे हे यश त्यांच्या कठोर परिश्रमाचे, सातत्याचे आणि शिस्तबद्ध सरावाचे फळ आहे, असे मत प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे यांनी व्यक्त केले. या यशात विद्यार्थ्यांच्या मेहनतीसोबतच पालकांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शक शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांना संतोष कुळमेठे, भूपेंद्र चौधरी, शाहिद शेख, शाहदुल्ला खान आणि रमण गागापूरवार यांनी अभ्यासासाठी सातत्याने मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल विद्यालयात विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण गडचिरोली परिसरातून कौतुक होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.



