
जिल्ह्यात पूरस्थिती ; ११ मार्ग बंद
गडचिरोली : जिल्ह्यात सोमवारच्या रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारी सकाळी जिल्ह्यांतर्गत ११ मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या पावसामुळे दोन व्यक्तींचा पुरात वाहून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटनाही समोर आली आहे.
भामरागड येथील पर्लकोटा नदीचे पाणी गावात शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने काही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले असले, तरी अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. याशिवाय, भामरागड तालुक्यातील कोडपे गावातील लालचंद कपिलसाही लकडा (१९) हा युवक खंडी नाला ओलांडत असताना पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्याचा मृतदेह मंगळवारी दुपारी हाती लागला.
दुसऱ्या घटनेत, अहेरी तालुक्यातील पल्ले येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक असंतू सोमा तलांडी (४०) हे पेरमिलीवरून आपल्या जोनावाही या गावी जात असताना सिपनपल्ली नाल्याच्या पुरात वाहून गेले. त्यांचा मृतदेह बुधवारीसकाळी शोध पथकाला मिळाला. भामरागडचे तहसीलदार किशोर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल आणि स्थानिक कर्मचाऱ्यांनी शोधमोहिम राबवली.
जोरदार पावसामुळे अनेक रस्ते आणि ठेंगण्या पुलांवर पुराचे पाणी आले आहे, त्यामुळे शेकडो गावांचा तालुका आणि जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. गडचिरोली शहरातही पावसाचा फटका बसला असून, गोकुळ नगरासह काही सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले. पारडी येथील शांताराम मुरतेली यांचे घर पडले, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मंगळवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यात 24 तासात सरासरी 82.1 मिमी पाऊस झाला. त्यात सर्वाधिक 147 मिमी देसाईगंज तालुक्यात झाला. याशिवाय गडचिरोली : 121.6 मिमी, धानोरा : 83.5 मिमी, देसाईगंज : 147.0 मिमी, आरमोरी : 128.3 मिमी, कुरखेडा : 61.6 मिमी, कोरची : 39.0 मिमी, चामोर्शी : 67.6 मिमी, मुलचेरा : 61.4 मिमी, अहेरी : 41.1 मिमी, सिरोंचा : 42.2 मिमी, एटापल्ली : 61.6 मिमी, भामरागड : 130.0 मिमी असा पाऊस झाला आहे.
बंद असलेले प्रमुख मार्ग
बुधवारी सकाळच्या स्थितीनुसार, पुरामुळे हेमलकसा-भामरागड राष्ट्रीय महामार्ग-१३० डी (पर्लकोटा नदी), अहेरी-वटरा रस्ता राज्यमार्ग ३७० (वटरा नाला), सिरोंचा-असरअली जगदलपूर राष्ट्रीय महामार्ग ६३ (सोमनपल्ली नाला), मनेराजाराम ते दामरंचा रस्ता (बांडिया नदी), चौडमपल्ली-चपराळा रस्ता (स्थानिक नाला), कोपला-झिंगानूर रस्ता, शंकरपूर ते विठ्ठलगाव रस्ता, कोकडी ते तुळशी रस्ता, कोंढाळा-कुरुड-वडसा रस्ता, भेंडाळा-बोरी गणपूर रस्ता (हळदीमाल नाला), हलवेर ते कोठी रस्ता हे ११ मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत.



