चंद्रपूरविदर्भ

चंद्रपुरात होणार शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय ; आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, जिल्ह्यात आता शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कर्मवीर मा. सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या परिसरात १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन नर्सिंग महाविद्यालय स्थापन करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून चंद्रपूरमध्ये शासकीय नर्सिंग महाविद्यालयाची मागणी केली जात होती. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी २९ सप्टेंबर २०२५ रोजी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे यासंदर्भात सविस्तर निवेदन सादर करून पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याने आता जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नर्सिंगच्या दर्जेदार शिक्षणासाठी इतर शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही.

नवीन महाविद्यालयामुळे दरवर्षी १०० प्रशिक्षित परिचारिका चंद्रपुरातून तयार होणार आहेत. यामुळे केवळ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार नाही, तर जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेलाही मोठा हातभार लागणार आहे. प्रशिक्षित परिचारिकांच्या उपलब्धतेमुळे सरकारी रुग्णालयांमधील रुग्णसेवेचा दर्जा अधिक सुधारण्यास मदत होईल.

या निर्णयाचे चंद्रपूर जिल्ह्यात स्वागत होत असून, यामुळे आरोग्य शिक्षणाच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम होणार आहेत. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे आरोग्य व शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळाली असून, स्थानिक विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे एक नवे दालन खुले झाले आहे. या महाविद्यालयाच्या स्थापनेमुळे चंद्रपूरची ओळख एक प्रमुख शैक्षणिक केंद्र म्हणून अधिक दृढ होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button