कृषीगडचिरोलीविदर्भ

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेमार्फत आदिवासी शेतकऱ्यांना सुधारित धान बियाणांचे वाटप

कृषी विज्ञान केंद्रात विशेष शेतकरी प्रशिक्षण व सुधारित धान बियाणे वितरण कार्यक्रम

गडचिरोली : भारतीय कृषि अनुसंधान परिषद, केंद्रीय कापूस संशोधन संस्था (नागपूर) आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ (अकोला) संलग्न कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर (गडचिरोली) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील अनुसूचित जमाती समूहातील शेतकऱ्यांसाठी विशेष शेतकरी प्रशिक्षण व सुधारित धान बियाणे वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील चांदाळा, तुकुम, गिरोला व कन्हाळगाव येथील ३० आदिवासी शेतकऱ्यांना कृषी उपयोगी निविष्टा म्हणून सुधारित धान बियाण्यांचे मोफत वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य शिवराम घोडके, समन्वय अधिकारी व वरिष्ठ शास्त्रज्ञ (वनस्पती रोगशास्त्र) डॉ. दिपक नगराळे, डॉ. सुहास करकुटे, डॉ. किशोर झाडे, डॉ. प्रितम एन. चिरडे, डॉ. विक्रम कदम, सुचित लाकडे, स्नेहा वेलादी आदी उपस्थित होते.

शिवरामजी घोडके यांनी उपस्थितांना नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून दिले. “नैसर्गिक शेतीकडे वळणे ही काळाची गरज असून, यामुळे उत्पादन खर्चात बचत होऊन जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होईल,” असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. कार्यक्रमाचे संयोजक डॉ. दीपक नगराळे यांनी ‘अनुसूचित जमाती विकास कृती आराखडा’ या केंद्र शासनाच्या योजनेची माहिती देत, आदिवासी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हेच या योजनेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगितले.

डॉ. सुहास करकुटे यांनी धान पिकावरील किडींचे व्यवस्थापन, तर डॉ. किशोर झाडे यांनी खरीप पीक नियोजन आणि हवामान आधारित तंत्रज्ञानावर प्रकाश टाकला. डॉ. प्रितम चिरडे यांनी धानाची उन्नत लागवड व हिरवळीच्या खताचा वापर, तर सुचित लाकडे यांनी भाजीपाला आणि बांधावर फळझाड लागवडीचे तंत्र सांगितले. डॉ. विक्रम कदम यांनी पावसाळ्यात जनावरांची निगा व लसीकरणाचे महत्त्व सांगितले, तर स्नेहा वेलादी यांनी शेतीतील यांत्रिकीकरणाचा वापर कसा करावा, यावर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमामुळे दुर्गम भागातील आदिवासी शेतकऱ्यांना प्रगत कृषी तंत्रज्ञान आणि शाश्वत रोग व्यवस्थापन पद्धतींची माहिती मिळाली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अंकुश ठाकरे आणि शशिकांत सलामी यांनी विशेष परिश्रम घेतले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुचित लाकडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button