
गडचिरोली : राज्यातील आरोग्य सेवा अधिक रुग्णाभिमुख आणि गुणवत्तापूर्ण करण्याच्या हेतूने आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर यांनी गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य सुविधांचा सखोल आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यात आयुक्तांनी औषधसाठ्यापासून ते रुग्णांच्या आहारापर्यंतच्या प्रत्येक बाबीची बारकाईने तपासणी केली.
महिला व बाल रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभाग (NICU), शस्त्रक्रिया कक्ष आणि प्रसूती वॉर्ड यांना आयुक्तांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी उपचार व्यवस्थेचा दर्जा तपासला. रुग्णालयातील स्वच्छता आणि व्यवस्थापन समाधानकारक असल्याचे नमूद करत त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे व त्यांच्या संपूर्ण टीमच्या कार्याचे कौतुक केले. आयुक्तांनी थेट मातांशी आणि आशा स्वयंसेविकांशी संवाद साधून त्यांना शासकीय योजनांचा लाभ वेळेवर मिळत असल्याची खात्री करून घेतली.
रुग्णालयाच्या औषध भांडाराची पाहणी करताना आयुक्तांनी रुग्णांना विनामूल्य औषधे वेळेवर मिळण्याबाबत कडक सूचना दिल्या. तसेच रुग्णांच्या जेवणाचे पोषणमूल्य आणि स्वयंपाकगृहातील स्वच्छतेची पाहणी केली. दर्जेदार भोजन आणि परिसर स्वच्छ राखणाऱ्या स्वच्छता कर्मचारी व स्वयंपाकगृह निरीक्षकांचा सत्कार करून आयुक्तांनी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवले.
जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांनी ‘१०२’ आणि ‘१०८’ रुग्णवाहिकांची तपासणी केली. त्यातील वैद्यकीय उपकरणांची कार्यक्षमता आणि सज्जता त्यांनी स्वतः तपासली. गंभीर रुग्णांवरील उपचारासाठी उपलब्ध मनुष्यबळ व यंत्रसामग्रीचा आढावा घेतल्यानंतर, आरोग्य यंत्रणेला अधिक सतर्क राहण्याचे निर्देश दिले.
यावेळी नागपूर मंडळाचे उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या पाहणी दौऱ्यामुळे गडचिरोलीतील आरोग्य यंत्रणेला बळकटी मिळून रुग्णसेवेत अधिक सुधारणा होण्यास मदत होणार आहे.



