गडचिरोलीविदर्भ

लवारी येथील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू; ‘उडान फाउंडेशन’ व ‘सहयोग मल्टीस्टेट’तर्फे शालेय साहित्याचे वाटप

कुरखेडा : शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासात मदत करण्यासाठी ‘उडान फाउंडेशन’ आणि ‘सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ (शाखा कुरखेडा) यांनी पुढाकार घेतला आहे. या सामाजिक भावनेतून जि. प. उच्च प्राथमिक शाळा, लवारी येथे इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंदाची पर्वणी ठरला.

उडान फाउंडेशनच्या सीएमडी शीतल रमादे यांच्या मार्गदर्शनातून या उपक्रमाची संकल्पना साकार झाली. या प्रसंगी सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे जिल्हा सिनियर डिस्ट्रिक्ट हेड योगेश खोब्रागडे यांच्या उपस्थितीत आणि शाखा व्यवस्थापक कैलासजी सहारे यांच्या सहकार्याने उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली. या मदतकार्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याची गरज पूर्ण होऊन त्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसून आला. स्थानिक शिक्षक, ग्रामस्थ आणि पालकांनी आयोजकांच्या या सामाजिक बांधिलकीचे मनापासून स्वागत केले.

या कार्यक्रमाला अल्का बावनथडे, सरोजजी रामटेके, ललित सरदारे, कांता चोपडे, चंद्रशेखर मेश्राम, शारदा देशमुख आणि नावेद पठाण यांच्यासह सहयोग सोसायटीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. नैना कोरघंटीवार यांनी उपक्रमाचे स्वागत केले. यावेळी घनश्याम मडावी, सोरते यांच्यासह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिक्षण, आरोग्य आणि मानवसेवा या क्षेत्रांत उडान फाउंडेशन आणि सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी सातत्याने कार्यरत आहे. समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वीतेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाप्रती असणारा उत्साह वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button