
कुरखेडा : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत असल्याने व्यापारी आणि नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित विभाग आणि कंत्राटदार कंपनीकडून कामात दिरंगाई होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत, प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
शहरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोरील आणि जुगलकिशोर भैय्या व प्रधान यांच्या दुचाकी गॅरेजसमोरील नालीचे काम दीर्घकाळापासून अर्धवट आहे. यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसून, रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. या समस्यांमुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांना दैनंदिन कामात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
व्यापाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत भाजप तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, शहर अध्यक्ष सागर निरंकारी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कंत्राटदार कंपनीचे व्यवस्थापक भूषण मोहरकर यांच्याशी चर्चा करून त्यांना जागेची पाहणी करायला लावली. जनहितार्थ हे काम सात दिवसांच्या आत पूर्ण करण्यात येईल, असे ठोस आश्वासन कंपनीच्या व्यवस्थापकांनी दिले आहे.
यावेळी बोलताना चांगदेव फाये आणि सागर निरंकारी यांनी केवळ महामार्गच नव्हे, तर शहरांतर्गत असलेल्या इतर समस्यांकडेही लक्ष वेधले. बायपास मार्गे आरजेवी शाळेकडे जाणारा रस्ता विद्यार्थ्यांसाठी अत्यंत धोकादायक झाला असून, पावसाळ्यामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे अपघातांना निमंत्रण देत आहेत. हा रस्ता तातडीने दुरुस्त करून नागरिकांना सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
या पाहणी दौऱ्यात भाग्यवान जनबंधू, विनोद नागपूरकर, बंटी देवढगले, व्यापारी जुगलकिशोर भैय्या व मनोज प्रधान यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. आता संबंधित विभाग दिलेल्या आश्वासनानुसार कामे पूर्ण करतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



