
सावंगी (बडगे) परिसरात दहशतीचे वातावरण
चंद्रपूर : वनपरिक्षेत्र तळोधी अंतर्गत येणाऱ्या सावंगी (बडगे) येथे रविवारी दुपारी पट्टेदार वाघाने गुराख्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत्यूच्या दाढेत सापडलेल्या या गुराख्याने दाखवलेल्या धैर्यामुळे आणि ग्रामस्थांच्या वेळीच मदतीमुळे त्याचा जीव थोडक्यात वाचला आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ या म्हणीचा प्रत्यय आला आहे.
सावंगी (बडगे) येथील रहिवासी ३० वर्षीय कांचन प्रकाश खोब्रागडे हे नेहमीप्रमाणे आपली गुरे घेऊन गोसेखुर्द कालवा परिसरातील जंगलात चराईसाठी गेले होते. दुपारी १२ वाजताच्या सुमारास झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. वाघाने त्यांना जमिनीवर पाडून फरफटत नेण्याचा प्रयत्न केला.
मृत्यू समोर असतानाही कांचन खोब्रागडे यांनी हार न मानता मोठ्याने आरडाओरडा केला. त्यांच्या किंकाळ्या ऐकून जवळच असलेले रवी वाडगुरे यांनी तातडीने धाव घेतली. रवी वाडगुरे यांनी दाखवलेल्या अफाट धाडसामुळे जखमी गुराख्याला वाघाच्या तावडीतून सोडविणे शक्य झाले. ग्रामस्थांच्या मते, जर काही क्षणांचाही विलंब झाला असता तर ही घटना अधिक गंभीर ठरू शकली असती.
घटनेची माहिती मिळताच गावकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. जखमी कांचन यांना तत्काळ तळोधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यानंतर वनविभागाच्या मदतीने त्यांना सिंदेवाही आणि नंतर पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गोसेखुर्द कालवा परिसरात वाघाचा वावर नवीन नाही. यापूर्वीही अनेकदा गुरांवर वाघाने हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, आता थेट माणसावर हल्ला झाल्याने सावंगी (बडगे) आणि आसपासच्या गावांमधील शेतकरी व गुराख्यांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या भागात तातडीने बंदोबस्त वाढवून वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.



