क्राईमगडचिरोलीविदर्भ

दारू तस्करी करणाऱ्या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग ; ८.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त

गडचिरोली : चामोर्शी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून दारू तस्करी करणारे वाहन पकडले. आरोपीने पोलिसांपासून वाचण्यासाठी वाहनासह पळ काढला होता, परंतु सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे आणि त्यांच्या पथकाने पाठलाग करून अखेर त्या वाहनाचा शोध लावून ८ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

एका एसयुव्ही वाहनातून (एम.एच. ४९, ए.ई. ५९२५) अवैधरित्या देशी-विदेशी दारूची तस्करी केली जाणार असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांना मिळाली होती. या माहितीनुसार, पोलिसांनी कुनघाडा फाटा येथे सापळा रचला होता. संशयास्पद वाहन येताच पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी राजेंद्र सपन मंडल याने यु-टर्न घेऊन रस्त्यावरील एका चारचाकी वाहनाला धडक दिली आणि पळ काढला.

आरोपीचे वाहन पळून गेल्यानंतर पोलीस पथकाचे स्वतःचे वाहन काही कारणाने अडकले असतानाही, पोलिसांनी हार मानली नाही. त्यांनी एका खाजगी वाहनाला थांबवून, रस्त्यावरील टायरच्या खुणांचा अचूक अंदाज घेत आरोपीचा जंगलात पाठलाग केला. आरोपी नवरगाव जंगल परिसरात वाहन सोडून पसार झाला होता, मात्र पोलिसांनी पंचासमक्ष गाडीची झडती घेतली असता त्यात दारूचा मोठा साठा आढळून आला.

देशी दारू: ३५०० सिलबंद बॉटल्स (किंमत २ लाख ८० हजार रुपये). बिअर: २४ कॅन (किंमत ७,२०० रुपये). रॉयल स्टॅग (देशी-विदेशी): १४८ नग सिलबंद निपा (एकूण ३६,८०० रुपये). वाहन: ५ लाख रुपये किमतीची एसयुव्ही. असा एकूण ८ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी आरोपी राजेंद्र सपन मंडल (२७, रा. कुनघाडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे आणि त्यांच्या पथकाने केलेल्या या धाडसी कारवाईमुळे अवैध दारू तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button