गडचिरोलीविदर्भ

दारूविक्रेत्यांच्या दारासमोर महिलांचा ठिय्या ; मुकडीगुटा येथे अवैध दारूविक्रीविरोधात महिला आक्रमक

दारूविक्रेत्यांनी अवैध व्यवसाय बंद करण्याची दिली ग्वाही

सिरोंचा : तालुका मुख्यालयापासून ४० किमी अंतरावर असलेल्या गुमलगुंडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मुकडीगुटा गावात अवैध दारूविक्रीविरोधात महिलांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. गाव संघटनेच्या निर्णयाचे उल्लंघन करून दारू विकणाऱ्या मुजोर विक्रेत्यांच्या घरासमोर तब्बल ४२ महिलांनी ठिय्या मांडत, दारूविक्री बंद न केल्यास तीव्र कायदेशीर व दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. महिलांच्या या आक्रमक भूमिकेमुळे अखेर दारूविक्रेत्यांनी नमते घेत गावात अवैध व्यवसाय बंद करण्याची ग्वाही दिली.

मुकडीगुटा गावात यापूर्वी मुक्तिपथ टीम आणि गाव संघटनेने अथक परिश्रम घेऊन गावातून अवैध दारूविक्री पूर्णपणे हद्दपार केली होती. सलग दीड वर्ष गावात दारूविक्री पूर्णपणे बंद होती. मात्र, मागील तीन महिन्यांपासून गावातील तीन मुजोर विक्रेत्यांनी गाव संघटनेच्या नियमांना केराची टोपली दाखवत पुन्हा अवैध दारूविक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. या अवैध दारूविक्रीमुळे गावातील शांतता पूर्णपणे भंग पावली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. दररोज सायंकाळी दारू पिऊन गावात भांडण-तंटे आणि मारहाणीचे प्रकार नित्याचेच झाले होते. गाव संघटनेकडून संबंधित दारूविक्रेत्यांना वारंवार सूचना व समज देण्यात आली होती, परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष करून आपली अवैध विक्री सुरूच ठेवली होती.

या गंभीर समस्येवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी मुकडीगुटा येथे गाव संघटनेच्या महिला आणि मुक्तिपथ टीमची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीनंतर गावातील ४२ महिलांनी एकत्र येत अवैध दारूविक्रीविरोधात जोरदार घोषणाबाजी करत गावातून रॅली काढली. ही रॅली थेट दारूविक्रेत्यांच्या घरांवर धडकली. महिलांनी विक्रेत्यांच्या घरापुढे ठिय्या मांडून घरांची पाहणी केली. महिलांनी विक्रेत्यांना ही शेवटची समज असल्याचे सांगत, अवैध व्यवसायामुळे गावातील कुटुंबांचे व महिलांचे होणारे नुकसान आणि निर्माण झालेल्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. यापुढे दारूविक्री सुरू ठेवल्यास ग्रामपंचायतच्या माध्यमातून कडक दंडात्मक कारवाई आणि पोलीस विभागाच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्याचा  इशारा दिला. अवैध दारूविरोधात महिलांचे हे आक्रमक आणि रणरागिणी रूप पाहून अखेर दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले. त्यांनी महिलांच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद देत, यापुढे गावात अवैध दारूविक्रीचा व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याची ग्वाही दिली.

यावेळी गाव संघटनेच्या महिलांसह मुक्तिपथ तालुक्याच्या संघटिका सुनीता भगत, उपसंघटक शंकर गागुरी, आणि स्पार्क कार्यकर्ता नितेश तांबडी उपस्थित होते. गावात पुन्हा शांतता प्रस्थापित करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button