गडचिरोलीविदर्भ

कुरखेडा ‘आरबीएसके’ पथकाची उल्लेखनीय कामगिरी; ५५ बालकांवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा गौरव

कुरखेडा : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा येथील वैद्यकीय पथकाने दुर्गम व आदिवासी भागातील बालकांसाठी अत्यंत कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. सत्र २०२५-२०२६ मध्ये तालुक्यातील ५ हृदयरोग बाधित बालकांसह हर्निया, हायड्रोसिल, अपेंडिक्स अशा विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या ५० बालकांवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना नवजीवन दिले आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या हस्ते कुरखेडा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित ठमके आणि डी.आय.सी. व्यवस्थापक प्रशांत खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात आरबीएसके (RBSK) पथकाने मागील वर्षभरात बालकांच्या आरोग्य तपासणी, निदान आणि उपचारांवर विशेष भर दिला. नुकत्याच झालेल्या हृदयरोग निदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त बालकांना उपस्थित ठेवून त्यांची ‘२ डी इको’ (2D Echo) तपासणी आणि औषधोपचार करण्यात आला. जन्मजात हृदयरोग, ओठ व टाळू विदीर्ण असणे, मोतीबिंदू आणि हर्निया यांसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या बालकांना उच्चस्तरीय रुग्णालयांमध्ये संदर्भित करून त्यांच्यावर मोफत उपचार घडवून आणण्यात या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

आरोग्य सेवेचा हा यज्ञ दुर्गम भागात यशस्वीपणे राबविल्याबद्दल वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश बोरकर, डॉ. अर्चना गऱ्हाटे, डॉ. प्राजक्ता दुपारे, डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. स्नेहा कृपाल आणि डॉ. अंकित बोरसरे यांचा गौरव करण्यात आला. या सन्मान सोहळ्यामुळे औषध निर्माण अधिकारी विनोद दुपारे, हेमंत बोरकर, धम्मप्रिय झाडे, परिचारिका टिकेश्वरी करमकार आणि वर्षा दुमाने यांच्यासह संपूर्ण आरोग्य कर्मचाऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.

वैद्यकीय पथकाचे अभिनंदन करताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे म्हणाल्या, “राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा बालकांच्या निरोगी भविष्याचा मजबूत पाया आहे. शेवटच्या घटकातील आणि दुर्गम भागातील प्रत्येक पात्र बालकापर्यंत वेळेत आरोग्य सेवा पोहोचवणे ही आपली जबाबदारी असून, सर्वांनी यापुढेही याच समर्पणाने कार्य करावे.”

गौरविण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हा सन्मान संपूर्ण आरोग्य विभागाच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे सांगत, भविष्यातही बालकांच्या आरोग्य संरक्षणासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची ग्वाही दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button