चंद्रपूरविदर्भ

कोळसा खाणीत कोळशाच्या ढिगाऱ्याखाली दबून चालकाचा मृत्यू

वरोरा तालुक्यातील एकोणा कोळसा खाण क्रमांक-१ येथील घटना ; मृताच्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत व न्याय मिळवून देण्याची सहकारी कर्मचाऱ्यांची मागणी

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील एकोणा कोळसा खाण क्रमांक-१ येथे गुरुवारी पहाटे कोळसा लोडिंग सुरू असताना झालेल्या भीषण अपघातात ट्रान्सपोर्ट कंपनीच्या चालकाचा कोळशाच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. या घटनेनंतर खाण परिसरात खळबळ उडाली असून मृताच्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत व न्याय मिळावा, अशी मागणी सहकारी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

वरोरा तालुक्यातील एकोणा कोळसा खाण क्रमांक-१ येथे गुरुवारी पहाटे सुमारे पाच वाजताच्या सुमारास कोळसा लोडिंगचे काम सुरू असताना अचानक कोळशाचा मोठा ढिगारा वाहनावर कोसळला. या दुर्घटनेत वाहन चालक पुष्पेंद्र सिंह (वय ५५, रा. मध्य प्रदेश), चढ्ढा ट्रान्सपोर्ट कंपनीचे चालक, हे कोळशाखाली दबले गेले.

घटनेची माहिती मिळताच सहकारी कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. मोठ्या प्रयत्नांनंतर त्यांना कोळशाच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. मात्र, गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच वेकोलि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे पाठविण्यात आला असून अपघाताच्या कारणांचा पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच आमदार करण देवतळे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात भेट देऊन अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. त्यानंतर मृत चालकाचे सहकारी व हेल्पर यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून मृताच्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत, योग्य भरपाई आणि न्याय देण्याची मागणी केली. या घटनेमुळे खाण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कोळसा लोडिंगच्या कामादरम्यान सुरक्षा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणीही कामगारांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button