
वारंवार फांद्या तुटूनही प्रशासनाचे दुर्लक्ष; चार महिन्यांपूर्वी दिलेल्या निवेदनावर कारवाई शून्य, नागरिकांमध्ये तीव्र संताप
भंडारा : नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा पंचायत समिती कार्यालयासमोर असलेला सुमारे २०० वर्षे जुना निंबाचा वृक्ष अत्यंत जीर्ण झाला असून, त्यामुळे नागरिक व वाहनधारकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. या वृक्षाच्या मोठ्या फांद्या वारंवार तुटून खाली पडत असून, याबाबत प्रशासनाला पूर्वकल्पना देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. प्रशासकीय अनास्थेमुळे परिसरात मोठ्या अपघाताची टांगती तलवार निर्माण झाली असून स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या अत्यंत धोकादायक वृक्षाबाबत एका स्थानिक व्यावसायिकाने २३ मार्च २०२६ रोजी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर केले होते. या निवेदनात वृक्षाची तातडीने पाहणी करून आवश्यक ती सुरक्षात्मक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, चार महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही प्रशासनाकडून यावर कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही किंवा प्रत्यक्ष कार्यवाही झालेली नाही.
काही दिवसांपूर्वीच या निंबाच्या वृक्षाची एक मोठी फांदी अचानक रस्त्यावर कोसळली. सुदैवाने त्या वेळी त्या ठिकाणी कोणीही उपस्थित नसल्याने मोठी जीवितहानी टळली; मात्र यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. पंचायत समितीचे परिसर आणि त्यातच राष्ट्रीय महामार्ग असल्याने या ठिकाणी दररोज हजारो नागरिक, शासकीय कर्मचारी, विद्यार्थी आणि वाहनांची मोठी वर्दळ असते.
सध्या पावसाळ्याचे दिवस असून सोसाट्याच्या वाऱ्यासह येणाऱ्या पावसामुळे हा संपूर्ण जीर्ण वृक्षच मुळासकट कोसळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी किंवा निष्पापांचा जीव जाण्यापूर्वी तज्ज्ञांमार्फत या वृक्षाची तातडीने पाहणी करण्यात यावी. धोकादायक फांद्यांची त्वरित छाटणी करावी आणि गरज भासल्यास हा वृक्ष सुरक्षितरीत्या हटवण्यात यावा, अशी आक्रमक मागणी केसलवाडा व परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.



