गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

आरोग्य विभागात खळबळ! ; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवर विनयभंग आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचा आक्रमक पवित्रा; डॉ. प्रताप शिंदे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आरोपांचे खंडन 

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचे विद्यमान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्या विरोधात विनयभंग, लैंगिक छळ आणि भ्रष्टाचारासाठी प्रवृत्त केल्याचे गंभीर आरोप समोर आल्याने खळबळ उडाली आहे. प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सुजिता वाडिवे यांनी याप्रकरणी रीतसर तक्रार दाखल केली असून, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून डॉ. शिंदे यांना तात्काळ पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.

डॉ. सुजिता वाडिवे यांनी केलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून डॉ. प्रताप शिंदे यांनी त्यांच्यावर मानसिक दबाव आणण्यास सुरुवात केली. जिल्ह्यातील हिवताप नियंत्रणासाठी लागणारी कीटकनाशके, औषधी आणि प्रयोगशाळा साहित्याची खरेदी प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न केला असता, डॉ. शिंदे यांनी आपल्या मर्जीतील पुरवठादारांना कंत्राट देण्यासाठी दबाव टाकला.

केवळ भ्रष्टाचारच नव्हे, तर डॉ. शिंदे यांनी सतत फोन करून मानसिक छळ करणे, जातीवाचक अपमान करणे, विनयभंग आणि लैंगिक छळ केल्याचाही गंभीर आरोप डॉ. वाडिवे यांनी लावला आहे. या प्रकरणात बनावट कागदपत्रे सादर करून शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

राष्ट्रीय मानवाधिकार संघटना, जिल्हा शाखा गडचिरोली (महिला आघाडी) या प्रकरणावरून आक्रमक झाली आहे. संघटनेच्या वतीने राज्याच्या गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव (ACS Home) मनीषा पाटणकर-म्हैसकर यांना निवेदन देऊन सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

“पीडितेला न्याय मिळेपर्यंत आणि दोषी अधिकाऱ्याला पदावरून दूर करेपर्यंत आमचा लढा सुरू राहील. जर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही, तर आम्ही राज्य मानवाधिकार आयोग, महिला आयोग आणि न्यायालयात दाद मागू,” असा इशारा संघटनेने दिला आहे. तसेच लवकरच जिल्हा परिषदेसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे.

एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांविरुद्ध इतके गंभीर आरोप करूनही अद्याप ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणामुळे आरोग्य विभागातील अंतर्गत कलह आणि भ्रष्टाचाराची चर्चा आता चव्हाट्यावर आली आहे. प्रशासनाकडून आता या संवेनदशील प्रकरणात काय पाऊल उचलले जाते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

माझ्यावर करण्यात आलेले विनयभंग आणि भ्रष्टाचाराचे सर्व आरोप पूर्णपणे असत्य, काल्पनिक आणि प्रशासकीय सूडबुद्धीने प्रेरित आहेत. कामात शिस्त आणण्याचा प्रयत्न केल्यामुळे आणि अनियमिततेवर जाब विचारल्यामुळे माझ्याविरुद्ध हे षडयंत्र रचले गेले आहे. मी या प्रकरणाच्या निष्पक्ष उच्चस्तरीय चौकशीची मागणी करत आहे. खोट्या तक्रारी करून विभागाची प्रतिमा मलिन करणाऱ्यांविरुद्ध मी मानहानीचा खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सत्य लवकरच समोर येईल.

– डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button