
गडचिरोली : विद्यार्थी दशेतच निर्व्यसनीपणाचे संस्कार रुजवण्यासाठी चामोर्शी तालुक्यातील १०५ शाळांमध्ये ‘तंबाखू मुक्त शाळा’ कार्यक्रम राबविण्यात आले. या मोहिमेअंतर्गत मुक्तीपथ चामोर्शी चमूच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे तालुक्यातील ४० शाळांनी तंबाखू मुक्तीचे निकष यशस्वीपणे पूर्ण करून तंबाखुमुक्त शाळेची ओळख प्राप्त केली आहे.
या मोहिमेअंतर्गत केवळ उपदेश न देता विद्यार्थ्यांना खेळ आणि संगीताच्या माध्यमातून तंबाखू व खर्रा खाण्याचे भीषण दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. या नाविन्यपूर्ण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांनी या विषयात रस दाखवून व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प केला आहे. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी ‘सैनिक’ म्हणून विशेष जबाबदारी स्वीकारली आहे. या विद्यार्थी सैनिकांनी गावांतून रॅली काढून जनजागृती केली. विशेष म्हणजे, शाळेच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या पन्नीची होळी करण्यात आली. शाळेत शिस्त राखण्यासाठी आणि व्यसनावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही ठिकाणी विद्यार्थ्यांची खिशे तपासणी देखील करण्यात येत आहे. मुक्तीपथचे तालुका संघटक आनंद इंगळे, उपसंघटक आनंद सिडाम आणि विनोद पांडे यांनी वर्षभरात तालुक्यातील १०५ शाळांना भेटी देऊन मार्गदर्शन केले. तंबाखू मुक्त शाळेसाठी आवश्यक असलेले निकष या शाळांकडून पूर्ण करून घेण्यासाठी या चमूने विशेष परिश्रम घेतले.
निकष पूर्ण करण्यासाठी प्रयत्न
तालुक्यातील एकूण १०५ शाळांमध्ये उपक्रम राबविण्यात आले. त्यापैकी ४० शाळा: पूर्णपणे तंबाखू मुक्त, २६ शाळा: ९ निकष पूर्ण, ३१ शाळा: ८ निकष पूर्ण, ०४ शाळा: ७ निकष पूर्ण, ०१ शाळा: ६ निकष पूर्ण तसेच ३ शाळांनी ५ निकष पूर्ण केले असून आपल्या शाळा तंबाखुमुक्त करण्यासाठी शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
तंबाखूमुक्त ठरलेल्या शाळा
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ठाकरी, कढोली, बहादूरपूर, वसंतपूर, राजगोपालपूर, जयरामपूर, कुथेगाव तसेच प्रबुद्ध हायस्कूल मूरखळ चेक यांसह एकूण ४० शाळांनी ‘तंबाखू मुक्त शाळा’ म्हणून मान पटकावला आहे. तालुक्यातील प्रत्येक शाळेत आता तंबाखू मुक्तीचे फलक लावण्यात आले असून, संपूर्ण चामोर्शी तालुक्यातील शाळा तंबाखू मुक्त करण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत.



