गडचिरोलीविदर्भ

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ ; २५६१ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ

गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ बुधवारी सुमानंद सभागृहात उत्साहात पार पडले. या शिबिरात गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील गडचिरोली, धानोरा आणि चामोर्शी तालुक्यांतील एकूण २,५६१ पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ, प्रमाणपत्रे, मंजुरीपत्रे व धनादेशांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा होते. प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे), पोलीस अधीक्षक एम. रमेश, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अरुण एम., चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, धानोराचे तहसीलदार गणेश माळी, चामोर्शीचे तहसीलदार प्रशांत घोरुडे, नगर परिषदेच्या उपायुक्त (नपा प्रशासन) अर्चना मेंढे, पंचायत समिती गडचिरोलीचे संवर्ग विकास अधिकारी अनिकेत पाटील तसेच गडचिरोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांची उपस्थिती होती.

यावेळी विविध विभागांच्या समन्वयातून नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला. लाभार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे, मंजुरीपत्रे, आर्थिक सहाय्याचे धनादेश तसेच विविध योजनांअंतर्गत मंजुरी देण्यात आली. शिबिरामुळे नागरिकांची शासकीय कार्यालयांमध्ये होणारी धावपळ कमी होऊन सेवा अधिक सुलभ आणि गतिमान पद्धतीने उपलब्ध झाल्याची भावना उपस्थित लाभार्थ्यांनी व्यक्त केली.

विविध विभागांकडून २,५६१ लाभांचे वितरण

शिबिरात महसूल विभागाने सर्वाधिक १,७४२ लाभांचे वितरण केले. याशिवाय पुरवठा विभागामार्फत १०३, संजय गांधी विभाग ८४, तालुका आरोग्य विभाग ७१, नगर परिषद ५८, उपअधीक्षक भूमी अभिलेख ५६, पंचायत समिती १२४, एकात्मिक बाल विकास सेवा योजना ६३, तालुका कृषी विभाग १६३, वन विभाग १९, सहाय्यक दुय्यम निबंधक विभाग २४, उमेद अभियान २९, महावितरण कंपनी २२ आणि बँक विभागामार्फत ३ लाभांचे वितरण करण्यात आले. अशाप्रकारे विविध विभागांच्या माध्यमातून एकूण २,५६१ लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला.

सहायक जिल्हाधिकारी अरुण एम. यांनी प्रास्ताविकातून शिबिरामागील उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार वनिश्याम येरमे व अरविंद शेंडे यांनी केले, तर तहसीलदार सागर कांबळे यांनी आभार मानले. शिबिराला गडचिरोली, धानोरा आणि चामोर्शी तालुक्यांतील हजारो नागरिक व लाभार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शिबिर यशस्वी करण्यासाठी चंदू प्रधान, ज्ञानेश्वर ठाकरे, एस. पी. शेख, अल्पेश बारापात्रे, देवेंद्र वाळके, गिरीश नरोटे यांच्यासह सर्व नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल कर्मचारी तसेच विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button