गोंदियाविदर्भ

अतिदुर्गम मुरकुटडोह, दंडारीत आरोग्य यंत्रणा सतर्क; जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांकडून पाहणी

अतिसंवेदनशील गावांतील किटकजन्य आजार प्रतिबंधात्मक कामांचा घेतला आढावा; डॉ. विनोद चव्हाण यांनी दिले महत्त्वपूर्ण निर्देश

गोंदिया : सालेकसा तालुक्यातील दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या अतिदुर्गम व हिवतापासाठी अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या मुरकुटडोह, दंडारी, दलदलकुही, टेकाटोला, नवाटोला आणि पिपरिया या गावांना जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेट देऊन किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमाची पाहणी केली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जंगलव्याप्त आणि दुर्गम भागातील नागरिकांना हिवतापाची साथ उद्भवू नये, यासाठी आरोग्य यंत्रणेची तयारी त्यांनी तपासून पाहिली.

पाहणी दरम्यान डॉ. चव्हाण यांनी दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रातील हिवताप बाधित रुग्णांची विचारपूस करून त्यांना दिल्या जाणाऱ्या औषधोपचाराची माहिती घेतली. तसेच परिसरात ‘आशा’ सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत राबविल्या जाणाऱ्या ताप रुग्ण शोध मोहीम आणि कंटेनर सर्वेक्षण कामाची प्रत्यक्ष पाहणी करत गावकऱ्यांशी संवाद साधला. आरोग्य केंद्रात देण्यात येणाऱ्या चांगल्या वैद्यकीय सेवांबद्दल त्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस गिरी व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले.

१००% आरडीके तपासणी: आश्रमशाळा व जि. प. शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची RDK किटद्वारे तात्काळ रक्ततपासणी करावी. रक्त नमुन्यांचा बॅकलॉग नको: आरोग्य केंद्रात हिवतापाच्या रक्त नमुन्यांची तपासणी प्रलंबित (Backlog) राहू देऊ नये. स्थलांतरितांची नोंद: रोजगारासाठी बाहेरगावी जाऊन परतलेल्या स्थलांतरित नागरिकांची यादी अद्ययावत करून त्यांची हिवताप तपासणी करावी. गप्पी मासे व प्रात्यक्षिके: शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी गप्पी मासे व डासांच्या अळ्यांचे (Larva) प्रात्यक्षिक दाखवावे. अंडवृद्धी शस्त्रक्रिया: कार्यक्षेत्रातील १०० टक्के अंडवृद्धी (Hydrocele) शस्त्रक्रिया पार पाडण्यासाठी रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात भरती करावे. अशा सूचना डॉ. विनोद चव्हाण यांनी दिल्या.

या दौऱ्यात त्यांनी दरेकसा आरोग्यवर्धिनी केंद्राच्या प्रयोगशाळेतील रजिष्टर व रेकॉर्डची तपासणी केली, तसेच आंतररुग्ण विभाग (IPD) आणि औषध साठा केंद्राची पाहणी करून मुबलक साठा ठेवण्याचे निर्देश दिले. या पाहणी दौऱ्यात जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांसोबत दरेकसाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस गिरी, आरोग्य पर्यवेक्षक किशोर भालेराव, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी ठाकरे यांच्यासह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button