गडचिरोलीविदर्भ

एसटी महामंडळाकडून प्रवाशांची होणारी गैरसोय थांबवा – अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची मागणी

गडचिरोली : जिल्ह्यातील बऱ्याचशा मार्गावर एसटी महामंडळाच्या बसेस फार अपुऱ्या चालत असल्यामुळे प्रवाशांची अतिशय गैरसोय होत आहे. तेव्हा सर्व मार्गावर पुरेशा व नियमित बसेस चालवून ही गैरसोय दुर करावी, अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने केली आहे.

शनिवारी दुपारी पक्षाच्या एका शिष्टमंडळाने केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांच्या नेतृत्वाखाली महामंडाळचे विभागीय नियंत्रक डॉ. चंद्रकांत वडस्कर यांची भेट घेवून याबाबतचे लेखी निवेदन सादर केले. व प्रशांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली.

गडचिरोली आगारातून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या अनेक बसेसे सुध्दा बंद आहेत. ग्रामीण भागातील बसेस बंद असल्याने विद्यार्थी, शेतकरी, महिला यांना बराच त्रास होत आहे, याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे. बऱ्याच बसेस जीर्णावस्थेत असून सुद्धा त्या चालविण्यात येत आहे, अश्या बसेसमुळे अपघात होत आहेत व नागरिकांना जोखीम घेऊन प्रवास करावा लागत आहे. तरी अशा जीर्ण झालेल्या बसेस रस्त्यांवर चालविण्यात येऊ नये, बसेसची नियमित साफसफाई केल्या जात नाही, त्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे, तरी बसेसची स्वच्छता नियमितपणे करण्यात यावी.

अनेक बसेस नियमित टाईमिंगवर चालत नसल्याने क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना प्रवास करावा लागतो, त्यामुळे प्रवाश्याना विशेषतः महिला, मुली व लहान मुलांना खूप त्रास सहन करावा लागतो. तरी बसेसमध्ये क्षमते एवढेच प्रवासी बसविण्यात यावे व सर्व बसेस निर्धारित टाईमिंगवर चालविण्यात याव्या. नागपूरसाठी इ बसेस सुरु करण्यात याव्या, गडचिरोली शहरातील नियोजित बस थांब्यावर खाजगी बसेस लावण्यात येत असल्यामुळे रहदारीला खूप त्रास होतो. तसेच महामंडळाचे आर्थिक नुकसान सुद्धा होते, तरी बस थांब्यावर लागणाऱ्या खाजगी बसेस वर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली.

शिष्टमंडळात रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, जिल्हाध्यक्ष हंसराज उंदिरवाडे, प्रदेश सचिव प्रा. राजन बोरकर, विधानसभा प्रभारी प्रदीप भैसारे, युवा आघाडी अध्यक्ष नरेंद्र रायपूरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नीता सहारे, संघटिका डॉ. अंकिता धाकडे, ज्येष्ठ कार्यकर्ते भरत जांभूळकर, कल्पना रामटेके, पुनम भैसारे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button