
पश्चिम बंगालमधील बांगलादेश सीमेवर बजावत होते देशसेवा; मूळ गावी पार्थिव पोहोचताच संपूर्ण परिसर शोकाकुल; माजी आ. कृष्णा गजबे यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली
कुरखेडा : देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण आलेले भारतीय सीमा सुरक्षा दलाचे (BSF) शूर जवान सुरेश आंबडर यांच्यावर त्यांच्या मूळ गावी, मरारटोला (ता. कुरखेडा) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या लाडक्या भूमिपुत्राला आणि वीर जवानाला शेवटचा निरोप देण्यासाठी संपूर्ण मरारटोला गाव अन् आजूबाजूच्या पंचक्रोशीतील हजारो नागरिक सती नदीच्या घाटावर लोटले होते.
सन २०१२ पासून बीएसएफमध्ये कार्यरत असलेले जवान सुरेश आंबडर हे सध्या पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवर तैनात होते. त्यांच्या वीरमरणाची बातमी समजताच संपूर्ण कुरखेडा तालुक्यावर शोककळा पसरली. शनिवारी रात्री त्यांचे पार्थिव मूळ गावी मरारटोला येथे आणण्यात आले. पार्थिव दिसताच आई, पत्नी आणि कुटुंबीयांनी केलेला आक्रांत उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. त्यांच्या अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलीच्या डोळ्यांतील निष्पाप भाव पाहून उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले.
सती नदीच्या घाटावर जवान सुरेश आंबडर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बीएसएफच्या तुकडीने हवेत फैरी झाडून सैनिकी सन्मानासह मानवंदना दिली. “शहीद सुरेश आंबडर अमर रहे” आणि “भारत माता की जय” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. शासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी (SDO), तहसीलदार आणि पोलीस ठाणेदारांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली.

याप्रसंगी प्रत्यक्ष उपस्थित राहून माजी आ. कृष्णा गजबे यांनी शहीद जवान सुरेश आंबडर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. ते म्हणाले, “मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देणारे शूर जवान सुरेश आंबडर यांचे सर्वोच्च बलिदान देश कधीही विसरणार नाही. या असीम दुःखाच्या प्रसंगी आपण सर्वजण शहीद जवानाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.”
या कठीण प्रसंगी संपूर्ण मरारटोला आणि कुरखेडा तालुका एकजुटीने शहीद जवानाच्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. जवान सुरेश आंबडर यांचे हे शौर्य, देशप्रेम आणि सर्वोच्च बलिदान मरारटोलासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी सदैव प्रेरणादायी आणि वंदनीय ठरेल.



