
अड्याळमेंढा शेतशिवारातील घटना; मजुरांच्या आरडाओरड्याने बिबट्या पसार ; जखमी मजुरावर रुग्णालयात उपचार सुरू
चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील उपवनक्षेत्र मिडाळाअंतर्गत येणाऱ्या जनकापूर परिसरात धान रोवणीच्या कामादरम्यान बिबट्याने अचानक हल्ला करून एका शेतमजुराला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि. २७) सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास अड्याळमेंढा शेतशिवारात घडली. या हल्ल्यामुळे जनकापूरसह परिसरातील शेतकरी आणि मजूर वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जनकापूर परिसरात सध्या धान रोवणीची कामे वेगाने सुरू आहेत. नेहमीप्रमाणे सकाळपासून शेतमजूर शेतात काम करत होते. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास सूर्यभान कन्नाके हे शेतालगतच्या नाल्याकडे गेले असता, झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली.
बिबट्याने अचानक हल्ला केल्यावर सूर्यभान यांनी मोठ्याने आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून जवळच रोवणी करणारे इतर मजूर हातात मिळेल ते साहित्य घेऊन घटनास्थळाकडे धावले. अनेक मजूर एकत्र येत असल्याचे पाहून बिबट्याने जंगलाच्या दिशेने पळ काढला.
सहकारी मजुरांनी जखमी सूर्यभान कन्नाके यांना तातडीने नागभीड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच उपवनक्षेत्र अधिकारी तावडे यांनी वनकर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याच्या पाऊलखुणांचा मागोवा घेऊन, परिसरात फटाके फोडून बिबट्याला मानवी वस्तीपासून दूर हाकलण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सध्या धान रोवणीचा हंगाम सुरू असल्याने शेकडो शेतकरी व मजूर दररोज शेतात कामासाठी जात आहेत. अशा ऐन कामाच्या दिवसांत बिबट्याचा वावर वाढल्याने जनकापूर, अड्याळमेंढा व लगतच्या गावांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. वनविभागाने या भागात त्वरित गस्त वाढवून नागरिकांच्या जीविताचे रक्षण करावे, अशी जोरदार मागणी स्थानिक गावकऱ्यांकडून होत आहे.



