
अवैध दारूविक्रीमुळे गावातील शांतता धोक्यात; पोलिसांना दिले निवेदन
मुलचेरा : मुलचेरा तालुक्यातील येल्ला गावात गेल्या काही महिन्यांपासून अवैध देशी-विदेशी दारूची विक्री पुन्हा सर्रास सुरू झाली आहे. यामुळे गावातील शांतता व कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे धोक्यात आली असून, तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या गर्तेत ढकलली जात आहे. या अवैध व्यवसायावर तात्काळ पोलीस प्रशासनाने टाच आणून दारूविक्री कायमची बंद करावी, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांनी अहेरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
अहेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या येल्ला गावात दारूच्या सुलभ उपलब्धतेमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. हा अवैध प्रकार रोखण्यासाठी गाव संघटनेने विविध उपक्रम राबवून ग्रामसभेत दारूविक्री बंदीचा अधिकृत ठराव घेतला होता. विक्रेत्यांना नोटिसा देऊन तसेच ग्रामसभेत बोलावून व्यवसाय बंद न केल्यास दंडात्मक कारवाईचा इशाराही देण्यात आला होता. या लोकचळवळीमुळे सलग १० महिने गावात दारूविक्री पूर्णपणे बंद राहण्यात यश आले होते.
मात्र, मागील ४ महिन्यांपासून दारू विक्रेत्यांनी पुन्हा डोके वर काढत अवैध व्यवसाय सुरू केला आहे. यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावात दररोज होणारे भांडण-तंटे व वादविवाद यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अवैध दारूविक्रीमुळे गावातील महिला, युवती आणि शाळकरी मुलींना नाहक मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अवैध दारू विक्री करणाऱ्या काही व्यक्तींवर यापूर्वीही पोलीस गुन्हे दाखल आहेत; मात्र तरीही त्यांची मुजोरी कायम असल्याने पोलिसांनी आता कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली जात आहे.
गावातील युवा पिढीचे भविष्य सुरक्षित राखण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी तात्काळ कारवाई करून येल्ला गावातील दारू पूर्णपणे बंद करावी, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली. निवेदन देताना येल्ला गावाच्या सरपंच ललिता कोडापे, उपसरपंच दिवाकर उराडे, पोलीस पाटील शंकर शेडमाके, मुक्तीपथ संघटनेच्या अध्यक्षा अल्का कोडापे, तंटामुक्त अध्यक्ष सुरेश रामटेके, आयसीआरपी (ICRP) सुषमा रामटेके आणि मुक्तीपथचे मुलचेरा तालुका संघटक रुपेश अंबादे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.



