
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनात मुख्याध्यापकांची महत्त्वपूर्ण बैठक; ‘नशा मुक्त भारत २०४७’ अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवण्याचे निर्देश
गडचिरोली : माओवादासह विविध आव्हानांचा सामना करत असतानाच गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत वेळोवेळी विविध जनजागृतीपर उपक्रम राबवले जातात. गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘नशा मुक्त भारत २०४७’ या अभियानाअंतर्गत “एक युध्द नशे के विरुध्द” या उपक्रमाच्या माध्यमातून ३० जुलै रोजी गडचिरोली पोलिसांच्या वतीने जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांची विशेष बैठक पार पडली. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली ही बैठक समाजात अंमली पदार्थांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आणि युवा पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
आयोजित बैठकीत पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी उपस्थित मुख्याध्यापकांशी संवाद साधून शालेय विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करणे, व्यसनाची सुरुवातीची लक्षणे ओळखणे आणि विद्यार्थ्यांना योग्य वेळी मार्गदर्शन व समुपदेशन करण्याबाबत सविस्तर चर्चा केली.
विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करून त्यांना चांगल्या सवयी लावण्याच्या उद्देशाने आणि नशाखोरीला पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी स्पर्धांचे आयोजन: शाळा-महाविद्यालयांमध्ये निबंध, चित्रकला, वक्तृत्व, पथनाट्य स्पर्धा आणि क्रीडा उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना व्यस्त व प्रेरित ठेवणे. अँटी ड्रग्ज कमिटी व सर्व्हेलन्स स्कॉड: प्रत्येक महाविद्यालयात ‘अँटी ड्रग्ज कमिटी’ (Anti-Drug Committee) स्थापन करणे आणि वसतिगृहांमध्ये विशेष ‘अँटी ड्रग्ज सर्व्हेलन्स स्कॉड’ तयार करणे. तक्रार पेटी व गोपनीय माहिती: शाळा परिसर, वसतिगृहे येथे तक्रार पेट्या बसवून अंमली पदार्थांच्या विक्रीबाबत मिळणारी गोपनीय माहिती तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याला देणे. संशयास्पद ठिकाणांवर करडी नजर: शाळा-महाविद्यालयांतील कॅन्टीन, स्टेशनरी दुकाने, खाद्यपदार्थ विक्रेते आणि ऑनलाईन पार्सल मागवणाऱ्या विद्यार्थ्यांवर तसेच ई-सिगारेटच्या (E-cigarette) वापरावर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत.
यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी व तरुणांना नशाबंदीचा संदेश दिला. “निरोगी शरीर, व्यसनमुक्त जीवन आणि उत्तम स्वास्थ्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे पूर्ण लक्ष केंद्रित केले पाहिजे. शिक्षणाचे महत्त्व ओळखून स्वतःचे, कुटुंबाचे आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे,” असे आवाहन त्यांनी केले.



