
बँक मॅनेजर, विद्यार्थिनी आणि रुग्णासाठी एसडीआरएफ व पोलिसांचे तातडीने रेस्क्यू ऑपरेशन
गडचिरोली : तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण होऊन मौजा कुंभी या गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला होता. अशा अत्यंत बिकट परिस्थितीत गावात अडकलेल्या तिघा नागरिकांना जिल्हा प्रशासनाने तातडीने बचावकार्य राबवून सुरक्षितपणे बाहेर काढले आणि त्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या.
कुंभी येथील समीर विजय गेडाम (वय २५) यांची राजस्थान येथे बँक मॅनेजर म्हणून नियुक्ती झाली असून, त्यांना पदावर रुजू होण्यासाठी तातडीने प्रवास करणे आवश्यक होते. तुलसी नवबोध गेडाम (वय २१) यांची नागपूर येथे परीक्षा असल्याने त्यांना वेळेत पोहोचणे आवश्यक होते. दिलीप पितांबर गेडाम (वय ५०) यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना पुढील तातडीच्या वैद्यकीय उपचारासाठी बाहेर काढणे गरजेचे होते.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी तातडीने जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने विलंब न करता एसडीआरएफ पथक आणि जिल्हा पोलिसांचे बचाव पथक बोट व अत्याधुनिक बचाव साहित्यासह कुंभी गावाकडे रवाना केले. एसडीआरएफचे पोलीस निरीक्षक जी. जे. खोब्रागडे, जिल्हा पोलीस बचाव पथकातील प्रेमानंद टेकाम व त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत समन्वयाने हे बचाव कार्य पूर्ण केले.
पुराच्या पाण्यातून तिन्ही नागरिकांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर, त्यांना त्यांच्या गरजेनुसार पुढील प्रवास आणि वैद्यकीय उपचारासाठी प्रशासनाकडून तात्काळ मदत पुरवण्यात आली. प्रशासनाच्या या जलद आणि प्रभावी कामगिरीमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.



