गोंदियाविदर्भ

जिल्ह्यात ८१.४२ टक्के मतदारांचे ‘फॉर्म डिजिटायझेशन’ पूर्ण

९८.९७ टक्के फॉर्मचे वाटप; उर्वरित अप्राप्त फॉर्म तातडीने जमा करण्याचे बीएलओंना आदेश

गोंदिया : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी मंदार पत्की यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत जिल्ह्यातील पुनरिक्षण कामाच्या प्रगतीचा सविस्तर पट मांडण्यात आला.

या बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी विजय अवधाने यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सादर करण्यात आलेल्या अधिकृत अहवालानुसार जिल्ह्यात एकूण 11,23,805 मतदारांपैकी 9,15,010 फॉर्मचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून हे प्रमाण 81.42 टक्के आहे. तसेच 11,12,257 फॉर्म वितरित करण्यात आले असून त्याचे प्रमाण 98.97 टक्के इतके आहे.

मात्र अद्याप 1,10,728 फॉर्म (9.85 टक्के) अप्राप्त असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय 91,248 विसंगती (8.12 टक्के) आढळून आल्या आहेत. जिल्ह्यात अद्यापही ९.८५ टक्के फॉर्म अप्राप्त असल्याचे आणि काही विसंगती दिसून आल्याचे निदर्शनास आल्यानंतर, जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी सर्व प्रलंबित व अप्राप्त फॉर्म तात्काळ गोळा करण्यासाठी सर्व बीएलओंना योग्य त्या सूचना देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

नागरिकांनी लोकशाहीच्या या प्रक्रियेत सहभाग नोंदवून आपले भरलेले फॉर्म वेळेत सादर करावेत आणि मतदार यादी दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण करावी. निवडणूक शाखेच्या सर्व यंत्रणांनी आपापसात समन्वय साधून उर्वरित सर्व कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button